www.24taas.com, झी मीडिया, वरळी
वरळीतल्या कॅम्पाकोला रहिवाशांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कॅम्पाकोला बिल्डिंगवर मंगळवारी हातोडा पडणार आहे. याआधी शेवटचे प्रयत्न म्हणून रहिवाशांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
कॅम्पाकोलावरच्या कारवाईला अवघे काही तास राहिलेत. डोक्यावरचं छप्पर वाचावं आणि आयुष्याची पुंजी गोळा करुन घेतलेलं घर टिकावं, यासाठी कॅम्पाकोलामधल्या रहिवाशांचे न्याय मिळवण्यासाठी शेवटचे प्रयत्न सुरू आहेत. कॅम्पाकोलासंदर्भात कायद्याच्या बाजूचा विचार करू आणि मग काय तो निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना दिलंय.
शुक्रवारी इथल्या रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुप्रीम कोर्टाचा अवमान होणार नाही, यादृष्टीनं काय करता येईल, याचा कायद्याच्या दृष्टीनं विचार सुरू असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण कुठलंही ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाही.
दरम्यान, कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना न्याय द्या, या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी महापालिकेत आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केलं. महापालिकेच्या सर्व समित्यांमध्ये कॅम्पाकोलावर कारवाई करण्याचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे ही इमारत तोडता येणार नाही, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.