www.24taas.com, मुंबई
आरपीआय कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतल्या कृष्णकुंज निवासस्थानावर काढलेल्या मोर्चावेळी आरपीआय कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्य हाणामारीवर उतरले.
मंगळवारी आझाद हिंद मैदानावरच्या सभेत राज ठाकरे यांनी दलित नेत्यांवर टीका केली होती. उत्तरप्रदेशात या पाकिस्तानी, बांगलादेशातील मुस्लिमांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमेची विटंबना केली . लखनौमध्ये तोडण्यात आलेल्या बुद्ध मूर्तींबद्दलही राज ठाकरेंनी जाब विचारला. ज्यावेळी उत्तर प्रदेशात बुद्ध मूर्ती तोडण्यात आल्या, त्यांची विटंबना झाली तेव्हा एकही बहुजनवादी नेता विरोध करायला का उभा राहिला नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. बुद्ध मूर्तींचं भंजन टीव्हीवर प्रत्येक वाहिनीवर दाखवण्यात आलं, तरी कुणी त्यावर प्रतिक्रिया का दिली नाही? बुद्ध मूर्ती तोडल्या गेल्या, तेव्हा कुठे होते मायावती, रा.सु. गवई, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर? असा खडा सवाल राज यांनी विचारला होता.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन आरपीआय कार्यकर्ते आक्रमक झालेत. दोन दिवसांपासूनं राज्यात अनेक ठिकाणी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करत आरपीआयची आंदोलनं होत आहेत. आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर जाऊन या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. विशेष म्हणजे अनेक तरुण-तरुणींचा यामध्ये समावेश होता. पोलिसांचीही या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी तारांबळ उडालेली दिसून आली.