www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता टीका केलीय़. शेजारच्या राज्यातले मुख्यमंत्री विकासाच्या गप्पा मारतायत, मात्र याच राज्यात खून कसे पडले आहेत याचं चित्र लोकांसमोर असल्याची टीका पवारांनी मोदी यांचं नाव न घेता केली आहे.
शरद पवारांनी मुंबईत अल्पसंख्याक समाजाच्या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. विकासाच्या गोष्टी अनेकजण करतात पण गुजरातमध्ये झालेले खून विसरणं कठीण आहे, असं म्हणत मोदींच्या गोध्रा जखमेवर पुन्हा बोट ठेवलं. याआधी मोदींची भेट घेतली तर त्यात गैर काय असा प्रश्न पवारांनी केला होता. आता थेट हल्लाबोल चढविल्याने पवार चर्चेत आहेत.
मोदींवर टीका करताना अल्पसंख्यांक मते राष्ट्रवादीकडे वळावीत, हाच उद्देश असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीम समाजाची मतं राष्ट्रवादीच्या गोटात वाढावी यासाठी पवारांनी हे विधान केल्याचं बोललं जात आहे. गुजरातमध्ये इतके लोक मारले गेले, तेही लोक विसरले नाहीत, असे पवार म्हणालेत.
दरम्यान, मोदींनी काँग्रेसवर पुन्हा जोरदार हल्ला चढवलाय. काँग्रेसची शेवटची घटिका जवळ आलीय, आणि लवकरच काँग्रेसमुक्त भारत पाहायला मिळेल, असं म्हणत नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी आज ईशान्येकडच्या राज्यांच्या दौ-यांवर आहेत. आसाममधल्या सिलचरमधल्या रॅलीत ते बोलत होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.