पत्नीला जीन्स, टी-शर्ट घालण्यास नकार द्याल, तर सावधान!

तुम्ही जर तुमच्या पत्नीला साडीच नेसा, जीन्स-टी-शर्ट घालण्यापासून रोखलं तर खबरदार... त्या एका कारणानं तुमचा घटस्फोट होऊ शकेल. मुंबईतील एका कौटुंबिक न्यायालयानंच याबाबतचा निर्णय दिला आहे. वांद्रे इथल्या एका घटनेवरून कोर्टानं हा निकाल दिलाय.

Updated: Jun 29, 2014, 08:58 AM IST
पत्नीला जीन्स, टी-शर्ट घालण्यास नकार द्याल, तर सावधान! title=
फाईल फोटो

मुंबई: तुम्ही जर तुमच्या पत्नीला साडीच नेसा, जीन्स-टी-शर्ट घालण्यापासून रोखलं तर खबरदार... त्या एका कारणानं तुमचा घटस्फोट होऊ शकेल. मुंबईतील एका कौटुंबिक न्यायालयानंच याबाबतचा निर्णय दिला आहे. वांद्रे इथल्या एका घटनेवरून कोर्टानं हा निकाल दिलाय.

पत्नीला जीन्स आणि टी शर्ट घालण्यापासून रोखणं, किंवा तिला साडी घालण्यासाठी प्रवृत्त करणं, म्हणजे क्रूरता असल्याचं, मुंबईतील एका कौटुंबिक न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे ‘कपडे’ हे कारणही घटस्फोट मागण्याचा आधार ठरू शकतं, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

या प्रकरणातील तरुणी २२ वर्षांची आणि तरुण ३१ वर्षांचा आहे. तरुणी चेंबूरची आणि तरुण अंबरनाथचा आहे. दोघांचं २०१०मध्ये लग्न झालं. लग्नापूर्वी ही तरुणी नवी मुंबईत नोकरी करीत होती. त्यावेळी आपल्यावर तरुणाच्या मधाळ बोलण्याचा प्रभाव पडला आणि त्यानं लग्नानंतर आनंदी ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं. आपल्याला ठाण्याच्या मॅरेज रजिस्ट्रार कार्यालयात नेऊन तिथं एका अर्जावर सही घेतली. तो अर्ज लग्नाच्या नोटिशीचा अर्ज होता, असं आपल्याला नंतर कळलं, असा दावा या तरुणीनं फॅमिली कोर्टापुढं केला.

लग्न झाल्यापासून पतीने आपल्यासाठी एकाही कपड्याची खरेदी केली नाही. त्यामुळं स्वत:च्या कमाईतून जीन्स आणि टी शर्ट खरेदी केल्याचं, पत्नीने कोर्टासमोर सांगितलं. मात्र पत्नीने असे कपडे परिधान करण्यास पतीचा नकार होता. पत्नीनं दररोज साडीच नेसावी असं, त्याचं म्हणणं होतं. एवढंच नव्हे तर सासरच्या मंडळींकडून तिला त्रास सुरू झाला.

माहेराहून पैसे न आणल्यानं अखेर तिला घराबाहेर काढण्यात आल्यानं ती माहेरी राहायला गेली. या प्रकारानंतर पतीनं तिच्याशी कधी संपर्कही ठेवला नाही.

पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळामुळं आपल्याला घटस्फोट देण्यात यावा, अशी विनंती तिनं फॅमिली कोर्टाकडे केली. यावर न्यायाधीश लक्ष्मी राव यांनी पत्नीच्या बाजूनं निर्णय देताना, अशी घटना ही क्रूरतेसमान असल्याचं म्हटलंय. शिवाय घटस्फोटाच्या अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये खर्च दिला जावा, असा आदेश पतीला दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.