www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या ईस्टर्न फ्री वेला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी मनसेनं केलीये. विधानसभेतले पक्षाचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलंय. परंतु, यापूर्वी या फ्री वेला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी आरपीआयने केली आहे.
ईस्टर्न फ्री वेच्या नावावरून आता राजकारण तापण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. फ्री वेला बाळासाहेब ठाकरे याचे नाव द्यावे अशी मागणी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी करून या राजकारणाला खतपाणी घालण्याचे काम सुरू केले आहे. तर दुसरीकडे या फ्री वेला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी यापूर्वीच रामदास आठवले यांनी केली होती असा दावा रिपब्लिकन पक्षाने केला आहे. तसेच राष्ट्रवादीनेही आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती.
एखादा प्रकल्प सुरू होतो न होतो, लगेच प्रकल्पाला कोणाचे नाव द्यावे याच्यावरून राजकारणाला सुरूवात झाल्याचे चित्र पुन्हा दिसू लागले आहे.
आरपीआयला आश्चर्य
मनसेने अशा प्रकारची मागणी केल्याबद्दल आम्हांला आश्चर्य होत आहे. सुमार दीड वर्षापूर्वीच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या फ्री वेला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली होती असा दावा आरपीआयचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी केला आहे. या रस्त्याचे उद्घाटन झाले त्यावेळी राष्ट्रवादीनेही यावेळी मागणी केली होती.
आंबेडकरी जनता मनसेला धडा शिकवले- राष्ट्रवादी
या रस्त्याच्या बांधकामात अनेक आंबेडकरी जनतेची घरं तुटली. त्यावेळी आंबेडकरी जनतेची मागणी होती की या रस्त्याला आंबेडकरांचे नाव द्यावे. या संदर्भातील एक पत्र आम्ही उद्घाटनाच्या १५ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. मनसेने अशी मागणी करणे चुकीचे आहे. इंदू मिलच्या बाबतही मनसेने अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आंबेडकरी जनता मनसेला धडा शिकवेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.