www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतातील पहिली मोनो रेल ही वडाळा -चेंबूर मार्गावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या मोनोरेलचे सारथ्य करण्यासाठी ४३ जणांची टीम सज्ज झाली आहे. यात बहुतांश मराठी तरूण आहेत.
अखेर ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोनोरेल वाहतुकीसाठी सज्ज झालीये. चेंबूर-वडाळा या मार्गावर प्रवासी वाहतुकीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आता लवकरच प्रत्यक्षात मोनो रेल रुळावर येण्याची तारीख जाहीर होईल.
देशातली पहिली मोनोरेल मायानगरी मुंबईमध्ये धावण्यासाठी सज्ज झालीये... चेंबुर-वडाळा-जेकब सर्कल या मार्गाला हा मान मिळणार आहे. यातला चेंबूर-वडाळा हा ८.८ किलोमीटर लांबीचा मार्ग येत्या १० ते १५ दिवसात वाहतुकीसाठी खुला होईल.
रेल्वे किंवा बसेसची फारशी कनेक्टिव्हिटी नसलेल्या या भागाला मोनोरेलमुळे फायदा होणार आहे. वातानुकुलित मोनोरेल मधून मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सुखकर होणार आहे. सुरूवातीच्या दिवसांत एकाच शिफ्टमध्ये मोनोरेल धावेल.
सकाळी सात ते दुपारी ३पर्यंत मोनोरेलमधून प्रवास करता येईल. काही कालावधीनंतर १६ ते २० तासांची सेवा देण्यात येईल. सुरूवातीला गाड्यांची फ्रिक्वन्सी १५ मिनिटांची असेल. कालांतरीनं त्यात घट करण्यात येईल. प्रत्येक तासाला ७००० प्रवाशांची वाहतूक यातून होऊ शकेल. तिकिटाचा कमीत कमी दर ५ रूपये असेल.
होणार होणार म्हणता म्हणता मोनोरेलचं उद्घाटन आता समीप आलंय. गेल्या कित्येक वर्षांची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आता मुंबईकरांचा याला कसा प्रतिसाद लाभतो आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे मुंबईच्या वाहतुकीवरचा ताण किती हलका होतो हे पाहणं औस्त्युक्याचं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.