मुंबई : महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या तारखेचा घोळ आता पुढे येत आहे. प्रत्यक्षात निवडणूक ९ मार्चला घेणे अपेक्षीत आहे. मात्र, अचानक आयुक्तांनी सुचवलेल्या बदलांमुळे महापौरपदाची निवडणूक एक दिवस आधीच म्हणजे ८ मार्चला होण्याची शक्यता आहे.
महापौर पदाची निवडणूक ८ मार्चलाच घेण्याच्या दृष्टीने प्रशासनानं तयारी सुरु केली आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ८ मार्चलाच निवडणूक झाल्यास मोठा प्रशासकिय पेच निर्माण होईल.२०१२ला निवडून आलेल्या जुन्या महापालिका सभागृह सदस्यांची मुदत ही ८ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत आहे. जर, ८ मार्चलाच निवडणूक घेतली तर नव्या नगरसेवकांसह जुने नगरसेवकही मतदानाचे दावेदार ठरतील.
मात्र, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी ८ तारखेला निवडणूक झाल्यास मोठा पेच निर्माण होणार असल्याने प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न येता नियमाप्रमाणेच निवडणूक घ्यावी असं म्हटले आहे.दरम्यान, 8 मार्चला उत्तर प्रदेशमध्ये अंतिम टप्प्यातील मतदान आहे. काँग्रेसने उघडपणे शिवसेनेला मदतीची भूमिका घेऊ नये, यासाठी ही खेळी असल्याचे म्हटले जात आहे. म्हणून भाजपला 8 मार्चला महापौर निवडणूक हवी आहे, अशी चर्चा आहे.