मुंबई: मुंबईतल्या भाडे नियंत्रण कायद्यातल्या बदलाच्या प्रस्तावावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपली होती. या मुद्द्यावरुन शिवसेनेनं आंदोलनही केलं होतं. पण भाडे नियंत्रण कायद्यात कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
या मुद्द्यावरुन आता शिवसेना श्रेय घ्यायचा प्रयत्न करत आहे. हा मुंबईकरांचा विजय आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार आणि दुसऱ्या पक्षांनी केलेल्या आंदोलनाबद्दल धन्यवाद, असं ट्विट युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
काय होते प्रस्तावित बदल ?
मुंबईमध्ये सुमारे 26 लाख भाडेकरु आहेत. यातले 2 लाख मोठे तर 24 लाख छोटे भाडेकरु आहेत. या भाडेनियंत्रण कायद्यातील दुरुस्ती मान्य झाल्या असत्या तर रहिवासी वापरासाठी ८४७ चौरस फुटांपेक्षा अधिक आणि व्यावसायिक वापरासाठी ५४० चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भाडेकरूंना कायद्याचं संरक्षण राहिलं नसतं. त्यामुळे त्यांना बाजारभावाप्रमाणे भाडं भरावं लागलं असतं. कायद्यामध्ये ही दुरुस्ती केली असती तर सध्याच्या भाड्यापेक्षा 200 पट अधिक भाडं द्यावं लागलं असतं, अशी भीती भाडेकरू हक्क संघटनेनं व्यक्त केली होती.