मुंबई : ओला, उबेर यासह अॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे यासाठी मुंबई ऑटो रिक्षा युनियनकडून आज एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतील रिक्षा या संपात सहभागी झालेल्या नाहीत.
दरम्यान, संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि तीन वर्ष झालेल्या लायसन्सधारक रिक्षा चालकांना बॅज देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप आहे.
युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले, मुंबईत पूर्णपणे रिक्षा बंद ठेवल्या जातील. त्याचबरोबर पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथेही परिणाम जाणवेल. तर अन्य शहरात निदर्शने केली जातील. आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार न केल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संप पुकारण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मुंबईत होणाऱ्या संपात १ लाख ४ हजार रिक्षा सहभागी होतील. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी परिवहन विभागाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवली आहे. मालवाहू वाहने तसेच इतर प्रवासी वाहने जसे बस आणि इत्यादीमधून बंद कालावधीत प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.