मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अडकले आहेत व महाराष्ट्रातील अनेक गावांत त्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. मोदी यांची गरज दिल्लीत असताना राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना इकडे असे अडकवून ठेवणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा आहे, असा आरोप करत पण येथे सत्य बोलायचे कोणी?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.
फक्त आपलेच मुडदे मोजायचे काय?, असा सवाल पंतप्रधान मोदी यांना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक बनू लागली आहे. पाकिस्तानी सैन्य रोजच युद्धबंदीचा करार पायदळी तुडवून भारतीय हद्दीत गोळीबार करून, तोफगोळे डागून निरपराध नागरिकांचे बळी घेत आहे, असेही या म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील मोदी यांची पाकिस्तान व कश्मीरबाबतची भाषणे प्रेरणादायी होती. मोदी व समस्त भाजप उत्सव मंडळाने या भाषणांवर कटाक्ष टाकला तरी देशाला नक्की काय हवे याची कल्पना येईल. देशाचे रक्षण करण्यासाठी व पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ५६ इंच छातीची गरज आहे काय? हा वादाचा मुद्दा, पण लढण्याची जबरदस्त इच्छा असेल तर कुणाची छाती मोजण्याचीही गरज नाही. महाराष्ट्राचे राजकारण नंतरही करता येईल पण मोदीजी, आता पाकड्यांच्या कुरापती सहन करू नका. आपण फक्त आपलेच मुडदे मोजत बसायचे काय? त्यांनी आमचे पाच मारले आहेत. त्यांचे ५० मारून मुंडक्यांची रास शिवरायांच्या महाराष्ट्रात घेऊन या. महाराष्ट्र मर्दांचा व शूरांचा नेहमीच सन्मान करतो!, असे सामनातून म्हटले आहे.
पाकड्यांना कायमचा धाक बसेल असे कोणतेच कठोर पाऊल मोदी सरकारकडून उचलले जात नसल्यामुळे पाकिस्तानची मस्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सीमेवर गस्त घालता-घालताच आपले जवान शहीद होत आहेत. निरपराध्यांच्या रक्ताने सरहद्दीवर रोजच अभिषेक सुरू आहे. आताही तेच घडले आहे. सोमवारी बकरी ईदच्या दिवशी पाकिस्तानने युद्धबंदीच्या चिंधड्या उडवत जम्मूजवळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला. या भयंकर हल्ल्यात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. असे असताना मोदी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.
सरहद्दीवरील भारतीय नागरिक गेली काही महिने जीव मुठीत धरूनच जगत आहे. लोक आपली घरे-दारे सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेत आहेत. पाकिस्तानसारख्या टीचभर देशामुळेभारतासारख्या खंडप्राय देशात अशी पळापळ व्हावी, हे नक्कीच चांगले लक्षण नाही. खरेतर हिंदुस्थानच्या केंद्रीय सरकारने याबाबत इस्रायलचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा, असा सल्ला देखील मोदी सरकारला दिलाय.
ताज्या हल्ल्यात भारतीय नागरिकांच्या रक्ताने सरहद्द भिजली असतानाही बकरी ईदची मिठाई पाकिस्तानला देण्याचा सोस कशासाठी? पुन्हा पाकड्यांनीच आपली मिठाई नाकारून सीमेवरचे गेट बंद करून घेतले, हा अपमान वेगळाच. पूर्वीच्या कॉंग्रेजी सरकारांनी जे केले तेच आताही सुरू राहणार असेल तर कसे व्हायचे? विद्यमान केंद्र सरकारने पाकड्यांसोबतची सचिव पातळीवरील चर्चा बंद करून झटका दिला असला तरी तेवढे पुरेसे नाही. गोळीला गोळीने उत्तर देऊ असा इशारा केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पाकिस्तानला दिला होता. तो अमलात कधी येणार?, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.