मुंबई : 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात पाच दिवसांपूर्वी सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंह यानं न्यायालयासमोर हा अपघात घडला तेव्हा आपण गाडी चालवत असल्याचं म्हटलं होतं... यानंतर अशोकची पत्नी अनिता हिनंही आता आपलं मौन सोडलंय.
एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना, आपल्याला या अपघाताची बातमी टीव्हीवर आलेल्या बातम्यांमुळे माहीत पडल्याचं अनितानं म्हटलंय. हा अपघात झाला त्या दिवशी आणि त्यानंतर 13 वर्ष अशोकनं आपल्याला याबद्दल काहीही सांगितलं नसल्याचं अनितानं म्हटलंय.
'मला जे काही माहीत आहे ते मला न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रांतून मिळालेल्या माहितीमुळे... माझ्या पतीनं मला याबद्दल कधीही काहीही सांगितलेलं नव्हतं. पण, हा त्यांचा स्वभावच आहे. ते घरी आपल्या कामाबद्दल काहीही बोलत नाहीत. काहीही न सांगणं हा त्यांचा निर्णय होता आणि कोर्टासमोर खरं सांगण्याचा निर्णयही त्यांचाच आहे. मी त्यांच्या निर्णयाचा मान राखते आणि मला अभिमान आहे की त्यांनी त्यांच्या मालकाला खाली पाहायला लावलेलं नाही' असं अनितानं म्हटलंय.
ते सलमानसोबत तेव्हापासून आहेत जेव्हापासून तो स्टारही बनलेला नव्हता. मला आनंद आहे की त्यांनी निष्ठा राखली. त्यांनी जर गप्प राहणंच पसंत केलं असतं तर 25 वर्षांच्या निष्ठेचं काहीही मोल राहिलं नसतं, असंही अनिता सिंह हिने म्हटलंय.
पण, अशोक सिंह एवढ्या वर्ष का गप्प होते असा प्रश्न जेव्हा अनिताला विचारण्यात आला तेव्हा ते परिस्थितीला घाबरले होते, असं अनिता म्हणतेय. सलमान सांगत होता की आपण गाडी चालवत नव्हतो, पण कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. याबद्दल माझ्या पतीनं सलीम सरांशी (सलमानच्या वडिलांशी) संवाद साधला आणि खरं काय ते सांगण्याचा निर्णय घेतला. सलमानचा दोष आपल्या डोक्यावर घेण्यासाठी त्यानं अशोकला मोठी रक्कम दिल्याचंही अनेक जण म्हणतायत पण आम्हाला सलमानकडून काहीही नकोय, असंही अनितानं म्हटलंय.
महत्त्वाचं म्हणजे, 28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानच्या लॅडक्रूजर कार वांद्र्याच्या एक बेकरीमध्ये घुसली होती. त्यावेळी, तब्बल 12 वर्षानंतर आपण गाडीच चालवत नव्हतो, असं उपरती सलमानला झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.