बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती; तिघांनाही फाशीची शिक्षा

दक्षिण मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात एका फोटो जर्नालिस्ट तरुणीवर बलात्कार प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयानं दोषींना शिक्षा सुनावलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2014, 04:50 PM IST

24taas.com, झी मीडिया, मुंबई
दक्षिण मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात एका फोटो जर्नालिस्ट तरुणीवर बलात्कार प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयानं दोषींना शिक्षा सुनावलीय. बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करण्याचा आरोप सिद्ध झालेल्या या खटल्यातील तीन दोषींना न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावलीय. तर या खटल्यातील चौथा आरोपी सिराज रेहमान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलीय.
३७६ ई कलमांतर्गत दोषींना फाशी सुनावण्यात आलेला हा पहिलाच खटला ठरलाय. तसंच पीडित जिवंत असतानाच दोषींना फाशी झालेलाही हा पहिलाच खटला आहे.
मुख्य सत्र न्यायाधीश शालिनी फनसाळकर - जोशी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (ई) नुसार(बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करणे) आरोपी विजय जाधव (१९ वर्ष), कासिम बंगाली (२१ वर्ष) आणि मोहम्मद सलीम अन्सारी (२८ वर्ष) यांना दोषी ठरवलं होतं. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर कायद्यामध्ये नव्याने दुरूस्ती करण्यात आली होती. या कलमानुसार दोषी व्यक्तीनं बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्यास त्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.
यापूर्वी, शक्ती मिल येथे मागील वर्षी जुलै महिन्यात टेलिफोन ऑपरेटर तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यामधील तीन आरोपी महिला पत्रकारावरील सामूहिक बलात्कारातही दोषी आढळले त्यामुळे सातत्याने हा गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने या तीन नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली गेलीय.
२२ वर्षीय फोटो जर्नालिस्ट मुलगी कामाच्या संदर्भात आपल्या एका सहकाऱ्यासोबत मध्य मुंबईस्थित शक्ती मिल परिसराकत गेली होती. इथंच विजय जाधव, कासिम बंगाली, सलीम अन्सारी, सिराज रेहमान आणि एका अल्पवयीन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.