www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झालाय. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाच वेळी सर्वच्या सर्व म्हणजेच २० मंत्र्यांचे राजीनामे घेतलेत. 'भाकरी करपण्याआधी फिरवावी लागते' असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. सोबतच आपल्या मंत्र्यांना 'लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहा' असा आदेशही दिला होता.
कुणी कुणी दिलेत राजीनामे
राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री : छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, मनोहर नाईक, गणेश नाईक
राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री : हसन मुश्रीफ, विजयकुमार गावित, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, लक्ष्मण ढोबळे, रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, अनिल देशमुख
राज्यमंत्री (राष्ट्रवादी) : भास्कर जाधव, सचिन अहिर, फौजिया खान, प्रकाश सोळंके, गुलाबराव देवकर
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेतलाय. पण, या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रचंड उलथापालथ होणार हे स्पष्ट आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा एकदा बैठक करण्यात आलीय. येत्या चार दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये चार ते पाच मंत्र्यांना डच्चू मिळण्याचीही शक्यता आहे.
नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा १५ जूनला होणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येतंय. प्रदेशाध्यक्षपदासाठी आर. आर. पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.