मुंबई: महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय.
पितृपक्षाचे कावळे उडाले...
गेली पंचवीस वर्षे हिंदुत्वाच्या विचारांनी घट्ट बांधली गेलेली शिवसेना-भाजपची युती दुर्दैवाने संपुष्टात आली आहे. शिवसेना-भाजप आणि घटकपक्षांची महायुती अखंड राहावी यासाठी आम्हीही शेवटपर्यंत प्रामाणिकपणे आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न केले, मात्र दुर्दैवाने युती कायम राहू शकली नाही. आता पुढे काय घडेल, काय बिघडेल ते दिसेलच. सर्व काही सांभाळण्यास आई तुळजाभवानी समर्थ आहे. ती जसे ठरवील तसेच होईल. फक्त या सर्व राजकारणात महाराष्ट्राच्या भवितव्याचे गणित बिघडू नये. महाराष्ट्र कोसळला तर इतिहास माफ करणार नाही. काल जे या तंबूत आरती करीत होते ते क्षणात दुस-या तंबूत जाऊन 'नमाज' पढतात. तेव्हा विचार, निष्ठा या शब्दांना तसे काही मोलच उरलेले नाही हे पटते. 11 कोटी जनतेच्या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत. 105 मराठी हुतात्म्यांच्या बलिदानावर गुळण्या टाकण्याचाच हा प्रकार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.