मुंबई : देशात प्रादेशिक राजकीय पक्षांच्या वाटचालीत आज अत्यंत दुर्मिळ आणि सुवर्ण असा योग जुळून येतोय. 19 जून 2016 म्हणजेच आज शिवसेनेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात शक्ति प्रदर्शन केलंय.
मुंबईतही तेच दृश्य पाहायला मिळतंय. होर्डिग्स आणि झेंड्यांच्या माध्यमातून अवघी मुंबई भगवी करण्यात आलीय. संध्याकाळी 4 वाजल्यापासून गोरेगाव पूर्व इथल्या नेस्को ग्राउंडवर सुवर्ण वर्षपूर्तीचा सोहळा होणार आहे. सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम आणि नंतर प्रमुख नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणं असं या कार्यक्रमाचं स्वरुप आहे.
महाराष्ट्राच्या कोनाकोप-यातून या कार्यक्रमासाठी आलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कोणता नवा विचार देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. शिवसेना-भाजपमध्ये वाढत असलेला वाद, केंद्र आणि राज्यातल्या भाजप प्रणित सरकारमध्ये सहभागी शिवसेनेची घुसमट, आगामी महापालिका निवडणुकांचं आव्हान, प्रादेशिक अस्मिता आणि हिंदुत्व यांची सांगड, या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे.