www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संप मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील १ लाख ३२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.
राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी संघटना आपल्या अनेक मागण्यांसाठी उद्यापासून संपावर जाणार होत्या. ८० वर्षे वयावरील निवृत्ती वेतनधारकांना १० टक्के जादा वाढ, वाहतूक भत्त्यात दुप्पट वाढ, अनुकंपा भरतीसाठी १० टक्के कोटा आदी मागण्या चव्हाण यांनी मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आलाय.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करावे, ही मागणी मात्र अमान्य करण्यात आली. तर, सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी सातत्याने शासनाबरोबर चर्चा करण्यात येत आहे. अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. परंतु प्रत्येकवेळी केवळ आश्वासनापलीकडे शासनाकडून काहीच मिळाले नाही, त्यामुळे संपाचे हत्यार उपसावे लागले, असे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.