मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ आणि वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं.
वांद्रे पोटनिवडणुकीत सरासरी 42 टक्के तर तासगाव कवठेमहांकाळ इथं सरासरी 58 टक्के मतदान झालं. वांद्र्यात शिवसेनेचे बाळा सावंत यांच्या निधनामुळं ही पोटनिवडणूक झाली तर तासगावात राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनामुळं ही पोटनिवडणूक झाली.
वांद्र्यात काँग्रेसचे नारायण राणे, शिवसेनेच्या तृप्ती सावंत आणि एमआयएमचे उमेदवार राजा रेहबार खान यांच्यात लढत होतेय.. मातोश्रीच्या अंगणात होत असलेल्या या निवडणूकीकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. वांद्र्यात ठाकरे कुटुंबियांनी तर अंजनी गावात आबांच्या कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला.
वांद्र्यातील नाट्यपूर्ण घडामोडी...
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. मतदानाला सुरुवात झाल्यापासून इथं विविध नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांसाह संशयास्पद पद्धतीने फिरणाऱ्या नितेश आणि निलेश या राणेपुत्रांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत तब्बल दोन तास चौकशी केली. या चौकशीनंतर या दोघांची सुटकाही झाली.
या चौकशीबाबत नितेश यांना विचारलं असता थकवा आला होता, म्हणून चहा प्यायला आलो असं सांगत मुद्द्यावर बोलणं टाळलं. तर दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. या अटकेमागे सरकारचा हात असून धक्काबुक्की करत पोलिसांनी जबरदस्ती पोलिस स्टेशनमध्ये आणलं असल्याचा दावा निलेश यांनी केला.
तर तिकडे काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. खासदार राऊत मतदारसंघात फिरत असल्याची तक्रार राणेंनी केली होती. या तक्रारीवरुन राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोडून दिलं.
मतदारसंघात शिवसेनेचा कोणताही बाहेरचा नेता फिरत नसल्याचं सांगत त्यांनी राणेंचे आरोप फेटाळलेत.. तसंच आपण मतदारसंघातले असल्याचा दावाही विनायक राऊत यांनी केलाय.
तर एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनाही निर्मलनगर पोलिसांनी अटक केली होती. कार्यकर्त्यांसह मतदारसंघात फिरत असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
@ सायंकाळी ४.४५ वाजता
तासगाव , सांगली ४३ टक्के मतदान
@ सायंकाळी ४.१० वाजता
वांद्रे पूर्व ३५ टक्के मतदान
तासगाव विधानसभा ४०.४१ टक्के मतदान
दुपारी ३.४५ वाजता
पोलिसांनी मला विनाकारण ताब्यात घेतलं. मी कोणतेही कायदे मोडले नव्हते तरीही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. विरोधक मात्र बिनधास्त फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई होत नाही. कारवाई फक्त आमच्यावरच होतेय - वरीस पठाण, एमआयएम
@ दुपारी २ वाजता
वांद्रे पोटनिवडणुकीसाठी २४ टक्के मतदान, तासगावमध्ये ३३ टक्के मतदान
@ दुपारी १.४५ वाजता
मला ताब्यात घेतले नव्हते. राणे थयथयाट करत आहेत. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल - विनायक राऊत
- शिवसेनेचे बाहेरील कुणी वांद्रे मतदारसंघात नाहीत, मी या मतदारसंघातील रहिवाशी आहे. - राऊत
@ दुपारी १.२० वाजता
एमआयएम आमदार वारीस पठाण यांना निर्मलनगर पोलिसांनी घेतले ताब्यात. बसवून ठेवले पोलीस ठाण्यात.
- आचारसंहिता भंग केला म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले
@ दुपारी १.१० वाजता
पोलीस ठाण्यात शिवसैनिक आणि पोलीसांमध्ये शाब्दिक चकमक... विनायक राऊत यांच्यासोबत शिवेसनेचे काही विभागप्रमुख आणि नेतेही बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये हजर
@ दुपारी १ वाजता
मुंबई > निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत भालेराव यांची माहिती
दुपारी १२ वाजेपर्यन्त २० टक्के मतदान
@ दुपारी १२ .४० वाजता
पोलिसांची शिवसेना नेत्यांवरही कारवाई
बाहेरील मतदारसंघातून आलेल्या लोकांना बाहेर जाण्याचे आदेश
@ दुपारी १२ .३० वाजता
खासदार विनायक राऊत यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. बीकेसी पोलीस ठाण्यात.
दुपारी १२.३० वाजता
'थकवा आला होता म्हणून चहा प्यायला आलो होतो...' - पोलिसांनी सोडल्यानंतर नितेश राणेंनी मूळ मुद्द्यावर बोलणं टाळलं
@ सकाळी ११.४० वाजता
राणे कांगावा करत आहेत. ती त्यांची जुनी सवय आहे. त्यांचा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेना सत्तेच्या दुरूपयोग करत नाही. निवडणूक आयोग निपक्षपाती काम करत आहे. - शिवसेना आमदार अनिल परब @ सकाळी ११.२० वाजता मुंबई > शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नीलेशला पोलीस यानी ताब्यात घेतले आहे. ही सरकारची दादागिरी आहे. शिवसेनेचे मंत्री आणि कार्यकरते फिरत असताना त्यांना का रोखत नाहीत. आता मी स्वत्ता त्याना रोखणार. पोलिसांना काय करायचे ते करू द्या. शिवसेनेने सत्तेचा दुरूपयोग केला आहे. मी पुलिस आयुक्तांना फोनवर बोललो आहे - नारायण राणे
@ सकाळी १०.२० वाजता
तासगाव > दि्वंगत आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील हिने बजावला मतदानाचा हक्क
@ सकाळी १०.१० वाजता
मुंबई > शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह मतदानाचा हक्क बजावला
@ सकाळी १० वाजता
तासगाव (सांगली) १८ टक्के मतदान
वांद्रे (मुंबई) ९ टक्के मतदान
@ सकाळी ९ वाजता
मुंबई > वाकोला पोलीस ठाण्यात नितेश राणे तर खेरवाडी पोलीस ठाण्यात, माजी खासदार नrलेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही राणे पुत्र पोलीस ठाण्यात. आचारसंहिता भंग केला आहे का याची माहिती घेण्यासाठी पोलीसांची चौकशी सुरू
मुंबई > खार गोळीबार परिसरात नितेश राणे यांना पोलीसांनी हटकलं... आचारसंहितेच्या नियमांनूसार नितेश राणे वांद्रे पुर्व विधानसभा मतदारसंघात बॉडीगार्डसह फिरू शकत नाहीत असा पोलीसांचा युक्तिवाद... समज देऊन पोलीसांनी नितेश राणेना जाऊ दिलं.
@ सकाळी ८.४० वाजता
मुंबई > शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचा आणि विश्वासू सहकारी चंपासिंग थापा यांनीही आज वांद्रे पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. थापा यांनी नवजीवन विद्यामंदिर या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं.
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ आणि वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे मतदान सुरू झाले आहे. वांद्रे पूर्वमध्ये बाळा सावंत यांच्या निधनामुळे होत असलेल्या वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत आणि कॉंग्रेसचे नारायण राणे यांच्यातील लढत उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
वांद्रे पूर्वमधल्या 254 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एकूण २ लाख ६५ हजार ५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वाकोला, निर्मलनगर आणि बीकेसी अंतर्गत सात मतदानकेंद्र अतिसंवेदनशील जाहीर करण्यात आलीयत. या पार्श्वभूमीवर इथं चौक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
"तासगाव‘मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीमती सुमनताई पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार स्वप्नील पाटील यांच्यातच प्रमुख लढत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. तासगांव-कवठे महांकाळ या मतदार संघात एकूण २ लाख ६५ हजार ५८६ मतदार असून त्यात १ लाख ३८ हजार ७८० पुरुष व १ लाख २६हजार महिला मतदार आहेत. तासंगाव-कवठे महांकाळ या मतदार संघातून राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित घोरपडे यांचा पराभव करून निवडून आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.