वस्त्रहरण झाले, पण द्रौपदी कोण? सामनातून भाजपवर सेनेचा हल्लाबोल

विधान परिषद सभापतींवरील अविश्वास ठरावावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं शिवसेनेला चांगलंच झोंबलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचं चुंबन घेताना दिसत आहेत, असल्या भाषेत सामनाच्या अग्रलेखामध्ये यावर झोड उठवण्यात आलीये. 

Updated: Mar 18, 2015, 10:11 AM IST
वस्त्रहरण झाले, पण द्रौपदी कोण? सामनातून भाजपवर सेनेचा हल्लाबोल title=

मुंबई: विधान परिषद सभापतींवरील अविश्वास ठरावावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं शिवसेनेला चांगलंच झोंबलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचं चुंबन घेताना दिसत आहेत, असल्या भाषेत सामनाच्या अग्रलेखामध्ये यावर झोड उठवण्यात आलीये. 

सत्ताधाऱ्यांनी दुर्योधनाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असं सांगत जनतेचं वस्त्रहरण झाल्याची शेलकी टीका उद्धव ठाकरेंनी या अग्रलेखातून केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती भेटीचा दाखलाही देण्यात आलाय. 

पाहा काय म्हटलंय अग्रलेखात- 

राष्ट्रवादी कॉंगे्रस व भाजप ‘युती’मुळे विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्‍वासाचा ठराव मंजूर झाला. विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने सभापतीपद राष्ट्रवादीस मिळावे अशी मागणी होती. लोकशाहीत आकडे व डोके मोजण्यावर भर असल्याने राष्ट्रवादीच्या मागणीत काहीच गैर नव्हते, पण कॉंगे्रस व राष्ट्रवादीचे हे भांडण नवे नाही व या भांडणात भाजप किंवा शिवसेनेने पडण्याचे कारण नाही. ते दोघे एकमेकांची धोतरे सोडण्यासाठी, कासोटे फेडण्यासाठी उतावीळ झाले होते. 

 त्या कासोटाफेडीत सत्ताधार्‍यांनी दुर्योधनाची भूमिका घेण्याची गरज नव्हती. द्रौपदीचे वस्त्रहरण दुर्योधनाने सुरू केले तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिच्या अब्रुरक्षणासाठी धावले. पण येथे शिवाजीराव देशमुख किंवा अजित पवार हे काही द्रौपदीच्या भूमिकेत नव्हते. त्यांचे फाटले असते किंवा सुटले असते तर त्यासाठी रामभक्तांना तसेच त्यांच्या हनुमानांना इतके व्यथित व्हायचे कारण नव्हते. शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले की, ‘‘राष्ट्रवादी आणि कॉंगे्रसचे भांडण हे रोजचेच आहे. प्रत्येक जण संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर वार करीतच असतो. मात्र आमच्या भांडणात भाजपने पडण्याची गरजच नव्हती’’.वाली आणि सुग्रीव यांच्या भांडणात एकमेकांना गदा लागली तरी चालले असते; परंतु या भांडणात रामाने बाण मारण्याची गरज नसतानाही त्याने तो का मारला?’’ हा सवाल शिवाजीराव देशमुखांनी विचारला आहे. 

राजकारणात कोणीही कुणाचे कायमचे शत्रू किंवा मित्र नसतो हे खरेच. तसे नसते तर विधानसभा निवडणुकीत ‘‘काका-पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला. काका-पुतण्यांपासून महाराष्ट्राला वाचवा’’, असे जाहीर सभांतून सांगणार्‍या पंतप्रधान मोदी यांनी बारामतीत जाऊन ‘‘काकासाहेब आपले मार्गदर्शक आहेत’’ वगैरे गौप्यस्फोट केले नसते. राष्ट्रवादीशी कोणतीही कसलीही युती शक्य नाही असे सत्तास्थापनेपूर्वी बोलणारे मुख्यमंत्री फडणवीस आज राष्ट्रवादीचे चुंबन घेताना दिसतात तेव्हा महाराष्ट्रातील ११ कोटी मराठी जनांना ‘‘आपणच द्रौपदी झालो असून भरबाजारात आपलेच वस्त्रहरण झाले’’ असे वाटू लागते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.