मुंबई : 'सामना' आणि शिवसेना हे नातं जगजाहीर आहे. भाजपच्या मनातली आणीबाणी बाहेर यायला लागली आहे. आज ते 'सामना' वर बंदी घालण्याची मागणी करीत आहेत, उद्या ते पक्षावर बंदी घालण्याची मागणी करतील, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली होती. त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन ते देशावर आणीबाणी लादण्याच्या प्रयत्नात आहेत का, हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. एका पद्धतीने हे बरं झाले की लोकांच्या मनात भाजपबद्दल असलेला चांगुलपणाचा संभ्रम दूर झालाय, असा हल्लाबोल उद्धव यांनी केला.भाजपच्या मनातले काळेबरे, मनातली आणीबाणी उघडपणे बाहेर आली आहे.
सामनामध्ये पेड न्यूज कुठे आहे? दाखवून द्या ! मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आणि 'सामना'चा संपादक आहे. भाजपला पेड न्यूजची सवय झाली आहे. त्यांना दुःख हेच की 'सामाना'त पैसे दिले तरी त्यांच्या बाजूच्या बातम्या लागत नाहीत, असे ते म्हणालेत.
माझ्या संपत्तीबाबत भाजपकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यात आले आहे आणि त्यासाठी माझे शिवसैनिक समर्थ आहेत. भाजपकडून खालच्या पातळीवर प्रचार होतोय, असा प्रतिहल्ला उद्धव यांनी केला.