www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज राष्ट्रवादीचं नवं मंत्रिमंडळ शपथग्रहण करणार आहे. याच नव्या मंत्रिमंडळात पवारांनी फिरवलेली भाकरी काही जणांना गोड लागेल तर काहींची मात्र भाकरी करपण्याची शक्यता आहे. साहेबांच्या या नव्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान मिळेल याबद्दल अनेक आडाखे बांधले जात आहेत. पाहुयात, कुणाला मिळू शकते संधी आणि कुणाची करपणार भाकरी...
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्रिमंडळात नगरच्या अकोले मतदार संघाचे मधुकार पिचड, साताऱ्यातीतील कोरेगाव मतदार संघाचे शशिकांत शिंदे, रत्नागिरी मतदार संघाचे उदय सामंत सोलापूरातील बार्षी मतदार संघाचे दिलिप सोपल आणि सोलापूरातील म्हाडा मतदार संघाचे संजय सावकारे यांची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय तर मंत्रिमंडळातून आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपूते, कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर, नगरविकास राज्य मंत्री भास्कर जाधव, आणि परिवहन राज्य मंत्री गुलाबराव देवकर यांना वगळण्यात आल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांमध्ये बबनराव पाचपूतेंना डच्चू देण्यात आलाय त्यामुळे आता आदिवासी विकास मंत्री पदावर मधुकर पिचड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. बबनराव पाचपूतेंना पक्षात नवी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रामराजे निंबाळकर यांच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी असंतुष्ठ असल्याने त्यांच्या ऐवजी आता साताऱ्याच्या कोरेगाव मतदार संघाचे शशिकांत शिंदे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागलीय. रामराजे निंबाळकर यांची लोकसभेसाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. भास्कर जाधवांनाही पक्षात नवी जबाबदारी देणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून काढून त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीनं उदय सामंत या नव्या चेहऱ्याला संधी दिलीय. पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
सोलापूरच्या बार्षी मतदार संघाचे दिलीप सोपल यांची मंत्रीमंडळात वर्णी लागलीय. सोपल यांच्यामुळे राष्ट्रवादीला माढा आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याचं बोललं जातंय. तर घरकूल घोटाळ्यात अडकलेल्या गुलाबराव देवकरांना डच्चू देऊन त्यांच्या ऐवजी भुसावळ मतदार संघाच्या संजय सावकारेंना संधी देण्यात आलीय. देवकरांना मंत्रिमंडळातून काढून राष्ट्रवादीनं आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला असला तरी भ्रष्ट्राचाराचे आरोप असलेल्या कोणत्याही बड्या नेत्यावर राष्ट्रवादीनं हात घातला नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.