नागपूर : उमरेड गावातील १९ वर्षाची ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी. तिच्या वयाच्या इतर तरुण-तरुणींप्रमाणे ही देखील फेसबूकच्या आहारी गेलेली. आईशा मल्होत्रा या खोट्या नावाने तिने फेसबूकवर आलिया भटच्या प्रोफाईल फोटोसह अकाऊंट तयार केलं.
फेसबूकवर मग तिची ओळख झाली अहमदनगरच्या उकळगावाच्या सलमान खानशी. अर्थातच सलमान खान हे देखील त्याचे काही खरे नाव नसून हे त्या तरुणी प्रमाणेच त्याचे फेसबूकचे `प्रोफ़ाइल पिक' होते.
फेसबुकवर झालेली ओळख पुढे वाढत गेली आणि दोघांनी एक-दुसऱ्याला भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे नगरचा हा २३ वर्षाचा सलमान खान ५ जानेवारीला उमरेडला आपल्या आईशाला भेटायला आला.
भेट झाल्यावर दोघांनी सोबत जगण्याची शपथ घेतली, आणि घरी काहीही न सांगता प्रेमात आंधळी झालेली ही तरुणी आपल्या प्रियकर सोबत शिर्डीला निघून गेली. कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या तरुणीला आयुष्याच्या पुढील खर्चाकरता एक कल्पना सुचली.
आपले अपहरण झाल्याचे सांगत २ लाख रुपयांची खंडणी आपल्या वडिलांना फोन करून मागण्याची तरुणीने प्रियकराला सूचवलं.
तरुणानं तसा फोनही केला. त्यानंतर पोलिसांनी शिर्डीच्या एका लॉजमधून दोघांना ताब्यात घेतले. सध्या दोघे नागपूरच्या सेन्ट्रल जेलमध्ये आहेत.