नाशिकमध्ये २०६० भूतबंगले

नाशिकमध्ये तब्बल २०६० घरं गरीबांसाठी बांधून तयार आहेत. पण कुणाचंच लक्ष या घरांकडे नाही. त्यामुळे या घरांचे अक्षरशः भूतबंगले झाले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 5, 2014, 11:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये तब्बल २०६० घरं गरीबांसाठी बांधून तयार आहेत. पण कुणाचंच लक्ष या घरांकडे नाही. त्यामुळे या घरांचे अक्षरशः भूतबंगले झाले आहेत.
घरकुलांची ही वास्तू आहे नाशिक महापालिकेच्या मालकीची. मात्र इथे राज्य आहे चोरट्यांचं.... झोपडपट्टीत राहणा-या गरीबांना ही घरं मिळणं अपेक्षित असताना चोरटेच या योजनेचे लाभार्थी ठरलेत. वडाळा शिवारातल्या या घरकुल प्रकल्पात बसवण्यात आलेले दरवाजे, खिडक्या, किचनमधलं बेसिन इलेक्ट्रीक फिटिंग चोरट्यांनी पळवून नेलंय.
९ इमारती आणि ७६० घरं असणा-या या प्रकल्पाचा ठेकेदार आणि महापालिका प्रशासन यांच्यात वाद सुरु झाल्यानं सगळी वाट लागलीय आणि या घरांचे भूतबंगले झालेत. २००७ मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प २०१२ मध्येच पूर्ण होणं अपेक्षित होतं. मार्च २०१५ मध्ये सर्वच घरांचं वाटप करण्याचं प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आलं होतं. आता याचिकाकर्त्यांनी पुन्हा कोर्टात जाण्याची तयारी केलीय.
११ हजार २०० घरांच्या या प्रकल्पासाठी २७० कोटी मंजूर झाले होते. मात्र सात वर्षात १७० कोटी रुपये खर्च करून केवळ २०६० घर तयार झालीयत. आता शिल्लक १०० कोटी रुपयात महापालिका जवळपास ९ हजार घर कशी उभारणार हा खरा प्रश्न आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.