www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनीकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. रस्त्यावरच्या गोरगरीब भिका-यांची किडनी काढून ती धनाढ्य व्यक्तींना विकली जातेय, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय.
रूबी हॉल क्लिनिक….. पुण्यातलं नावाजलेलं रूग्णालय... मात्र या रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. अमेरिकेतून पुण्यात स्थलांतरित झालेले सुलतान हुसेन यांच्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या होत्या. डॉक्टरांच्या सल्यानंतर त्यांच्यावर डिसेंबर २००२ साली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली... हुसेन यांना किडनी दिली त्यांचा भाचा सुलेमान नरसिंगानीया यानं.... कागदोपत्री किडणी प्रत्यारोपनांची प्रक्रिया पूर्ण झाली... आणि हुसेन यांच्यावरची शस्त्रक्रियाही यशस्वी झाली... मात्र हुसेन यांना जी किडनी प्रत्यारोपित करण्यात आली ती त्यांचा भाचा सुलेमान नरसिंगानीया याची नसल्याचं उघड झालंय. कारण सुलेमान नरसिंगानी याच्या दोन्ही किडन्या व्यवस्थित आहेत, तसा रिपोर्टच पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयानं दिलाय. म्हणजेच, हुसेन यांना भलत्याच व्यक्तीची किडनी बसवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.
सुलेमान नरसिंगानीय यांना १८ डिसेंबर २००२ रोजी किडनी प्रत्योरपणासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.. त्याचवेळी त्यांच्याच बाजुच्या एका कॉटवर एका भिका-यालाही ऍडमिट केलं होतं... त्या भिका-याची किडनी सुलेमान यांचे मामा सुलतान हुसेन यांना प्रत्यारोपण करण्यात आली. त्यासाठी त्या भिका-याला पैसेही देण्यात आले. सुलतान हुसेन यांच्याकडून रूबी हॉल हॉस्पिटलने २००२ साली १६ लाख रूपये उकळल्याचा आरोप सुलेमान नरसिंगानिया यांनी केलाय.
दरम्यान, सगळ्या प्रकाराबात रवींद्र बराटे आणि सुलेमान नरसिंगानि यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये रूबी हॉस्पिटलच्या विरोधात तक्रारही दिलीय. मात्र अजूनही रूबी क्लिनीकवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
रूबी हॉल हॉस्पिटलने मात्र या सर्व प्रकाराबाबत वेगळीच भूमिका घेतलीय. ही घटना २००२ मध्ये घडलीय. त्यामुळे आमच्याकडे या केसचे रेकोर्ड उपलब्ध नाही. असं रुबी हॉलचं म्हणणंय. आश्चर्याची बाब म्हणजे बराटे यांच्याकडे मात्र हे रेकॉर्डस उपलब्ध आहेत आणि त्यांनी ते रूबी हॉल हॉस्पिटलकडूनच महिन्याभरापूर्वी मिळवले आहेत. त्यासाठी हॉस्पिटलनं त्यांच्याकडून २०० रुपये शुल्कही घेतलं.
या धक्कादायक आणि गंभीर प्रकारची चौकशी होणार का… हा आता खरा प्रश्न आहे… कारण याच रूबी हॉल हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच झाले आहे… त्यामुळे अशी राजकीय पोहोच असलेल्या या बड्या हॉस्पिटल वर कारवाई होणार का… याकडे लक्ष लागलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.