www.24taas.com, लोणावळा
पर्यटकांचं आवडीचं ठिकाण म्हणजे लोणावळा. या लोणावळ्यात गेलेल्या पर्यटकांच्या लूट करण्यात होत असल्याचं आता उघड झालंय. लोणावळा नगरपरिषदेच्या ठेकेदारानं पर्यटकांची लूट करून लाखोंच्या तुमड्या भरल्यायत. ‘झी 24 तास’नं याचा पर्दाफाश करताच आता ठेकेदारावर कारवाईची मागणी होऊ लागलीय.
लोणावळा नगरपरिषदेनं प्रदूषण कर आणि प्रवासी कर वसूल करण्यासाठी ठेकेदाराला ठेका दिला. त्यानुसार लहान वाहनांसाठी १५ रुपये, मोठ्या वाहनांसाठी २० रुपये आणि प्रवासी कर म्हणून पर्यटकांसाठी पाच रुपये कर आकारण्याची परवानगी ठेकेदाराला देण्यात आली. पण ठेकेदारानं या नियमांना फाटा देत बिनदिक्कत चक्क पन्नास रुपयांच्या पावत्या तयार केल्या. त्यावर नगरपरिषदेचे बनावट शिक्केही मारण्यात आले. ठेकेदार एवढ्यावरच थांबला नाही तर पायी जाणाऱ्या प्रवाशांनाही प्रदूषणकराची पावती देऊन पाच रुपये लुटले जात होते. नियम माहीत नसणारे प्रवासी पन्नास रुपये देऊन पुढं जायचे. नगरपरिषदेचे नियम धाब्यावर बसवून आतापर्यंत लाखो रुपयांच्या तुमड्या ठेकेदारानं भरल्या.
ठेकेदाराच्या या फसवणुकीची बातमी समजताच ‘झी 24 तास’ची टीम लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि नगरसेवक सुनील इंगुळकर टोल नाक्यावर पोहोचले. त्यावेळी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांच्या गाडीचीही पन्नास रुपयांची बनावट पावती हातावर टेकवली.
‘झी 24 तास’नं टोलनाक्यांवरची ही लूटमार उघड केल्यानंतर आता या ठेकेदारावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येतेय.