www.24taas.com, सोलापूर
२६ डिसेंबर रोजी सोलापूरात एका अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर बलात्कारीत मुलींकडे बघण्याच्या दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि त्या मुलीला स्वावलंबी बनवण्यासाठी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे पुढे आल्यात.
प्रणिती शिंदे यांनी या पिडीत मुलीचं पालकत्व स्वीकारुन या मुलीची सर्व जबाबदारी स्वीकारलीय. मुलीवर बलात्कार झाला की समाजाचा त्या मुलीकडे, त्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो, तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. समाजाने मानसिकता बदलण्याची गरज असून कायदेही कडक करण्याची मागणी प्रणिती शिंदे यांनी केली.
उत्तर सोलापूरमधील कोंडी इथं ही बलात्काराची घटना घडली होती. पीडीत मुलीचे आईवडील वीटभट्टी कामगार आहेत. ती आईवडीलांबरोबर सोलापुरातल्या कुंभारगल्लीत वास्तव्याला होती. मुलीचे आईवडील घरी नसताना त्याच परिसरातल्या दोन अल्पवयीन मुलांनी मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन मुलांना अटक करण्यात आलीय.