मावळ प्रकरणी पोलिसांना २४ लाख रुपये?

मावळ आंदोलनादरम्यान पुरवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेनं पोलिसांना 24 लाख रुपये देण्याचं मंजूर केलंय. एवढंच नाही तर पुढंही बंदोबस्तासाठी पैसे लागले तर ते देण्याची तरतूदही करण्यात आलीय. त्यामुळं या योजनेसाठी महापालिका आणि पर्यायने राष्ट्रवादी काँग्रेस किती आग्रही आहे हे पुन्हा सिद्ध झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 21, 2013, 08:30 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
मावळ आंदोलनादरम्यान पुरवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेनं पोलिसांना 24 लाख रुपये देण्याचं मंजूर केलंय. एवढंच नाही तर पुढंही बंदोबस्तासाठी पैसे लागले तर ते देण्याची तरतूदही करण्यात आलीय. त्यामुळं या योजनेसाठी महापालिका आणि पर्यायने राष्ट्रवादी काँग्रेस किती आग्रही आहे हे पुन्हा सिद्ध झालंय.
पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून बंद पाईप लाईनमधून पाणी आणण्याची महत्वाकांशी योजना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेनं आखली आहे. परंतु त्याला मावळमधल्या शेतक-यांनी जोरदार विरोध केला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ शेतकरी मरण पावले. त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचं आश्वासन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनं दिलं होतं. ते आश्वासनही पालिकेनं पूर्ण केलेलं नाही. एकीकडे शेतक-यांची अशी क्रूर चेष्टा सुरु मांडली असताना पालिकेनं शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं आणखी एक काम केलंय. मावळ गोळीबारापूर्वी आणि गोळीबारादरम्यान पुरवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी तब्बल २४ लाख १३ हजार रुपये पोलिसांना देण्याचं महापालिकेनं मान्य केलंय. तसा ठराव स्थायी समितीनं विनाचर्चा मंजूर केलाय. हा पैसा शेतक-यांवर गोळीबार करण्यासाठी पालिकेनं पुरवलाय का असा संतप्त सवाल विरोधक करत आहेत.
पैसे मंजूर करून अडचणीत आलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही नेता याबाबत बोलायला तयार नाहीय. महापालिकेच्या या निर्णयामुळं मावळ परिसरातील शेतक-यांच्या संतापात आणखी भर पडलीय.