www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सहलीचे टेंडर चांगलेच गाजले होते. अवाच्या सव्वा दर आणि टेंडर एका ठेकेदाराच्या नावाने आणि प्रत्यक्षात काम करणारा दुसराच. असा घोटाळा सहलीच्या टेंडरमध्ये उघड झाला होता. मात्र टेंडर न काढताही शिक्षण मंडळ घोटाळे करू शकतं. आणि तोही कोट्यावधी रुपयांचा... शिक्षण मंडळाने ऑक्टोबर २०१२ मध्ये विद्यार्थ्यांसाठी ३३४ संगणकांची खरेदी केली. त्यासाठी शिक्षण मंडळानं पुरवठादाराला प्रत्येक कॉम्प्युटरसाठी २९ हजार 768 रुपये दिले. म्हणजेच 334 कॉम्प्युटर्ससाठी ९९ लाख ४२ हजार 512 रुपये अदा केले. यातली धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही टेंडरविनाच शिक्षण मंडळानं एवढा मोठा व्यवहार केलाय.
राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दर पत्रकानुसार संगणक खरेदी केली. असं शिक्षण मंडळाचं म्हणणं आहे. मात्र जरी दर पत्रकानुसार खरेदी असली तरी, ठेकेदाराची निवड कशी केली, हा महत्वाचा प्रश्न आहे. पैशांचा आकडा एक कोटीच्या पुढे गेला असता तर, शिक्षण मंडळाला या संगणक खरेदीसाठी टेंडर काढावं लागलं असतं. ते टाळण्यासाठीच ९९ लाख ४२ हजार एवढी रक्कम ठेवण्यात आल्याचा आरोप होतोय.
या पुरवठादारावर शिक्षण मंडळाची एवढी कृपा की त्याला जकातमाफीही देण्यात आलीय. शिक्षण मंडळाला आणखी सुमारे ६०० संगणकांची खरेदी करायची आहे. हा ३३४ संगणकांच्या खरेदीचा अनुभव पाहता आगामी संगणक खरेदी पारदर्शीपणे केली जावी. अशी मागणी होतेय. त्याचबरोबर या संगणक खरेदी घोटाळ्याची चोकाशीची मागणीही करण्यात येतेय...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.