उदयनराजे भोसलेंबाबत शरद पवार म्हणालेत, `तवा`च रिकामा!

सातारा लोकसभा मतदार संघात भाकरी फिरवणार काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी विचारला, त्यावेळी साता-यात तवाच रिकामा आहे, असं उत्तर पवारांनी दिलंय. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर मोदी भेटीवर गोपीनाथ मुंडेना जोरदार टोला लगावला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 1, 2014, 09:03 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, सातारा
सातारा लोकसभा मतदार संघात भाकरी फिरवणार काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी विचारला, त्यावेळी साता-यात तवाच रिकामा आहे, असं उत्तर पवारांनी दिलंय. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर मोदी भेटीवर गोपीनाथ मुंडेना जोरदार टोला लगावला.
दरम्यान, झी २४ तासला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उदयनराजेंची उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जातंय. कारण राष्ट्रवादीला उदयनराजेंची जशी गरज आहे तशीच उदयनराजेंनाही आहे. याशिवाय नरेंद्र मोदींच्या भेटीबद्दल ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्याबद्दलही पवारांनी कोपरखळी लगावलीय. गोपीनाथ मुंडेंचाही त्यांनी समाचार घेतला.
सातारा आणि माढा मतदार संघात राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार यावरून राजकीय डावपेच रंगू लागलेत. याचवेळी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साताऱ्यात ग्रामीण विकास यंत्रणेच्या बैठकीला आले होते. मात्र या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित नव्हते.
नरेंद्र मोदींच्या भेटीचं वृत्त वाचून ज्ञानात भर पडल्याचं सांगत पवारांनी कोपरखळी मारली. निवडून येणार नाहीत म्हणून ते राज्य सभेवर गेले, अशी टीका इचलकरंजीतल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी यांनी केली होती. यालाही पवारांनी उत्तर दिलंय. आमच्याच पक्षाच्या एका उमेदवाराने त्यांचा परावभव केला होता. कदाचित वय झाल्यामुळे ते बिथरले असतील, असा टोला पवारांनी लगावला.
२६/२२ या फाँर्म्युल्यावर काँग्रेससोबत चर्चा सुरु आहे. काही ठिकाणच्या जागा दोघांनाही बदलून हव्यात. विरोधी पक्षांनी प्रचाराला सुरुवाती केलीय. त्यामुळे लवकर जागा वापट व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं ते म्हणाले. सोमवारी अनेक जिल्ह्याच्या प्रतिनिधींशी उमेदवार निश्चित करण्याबाबत बैठक घेणार असल्याचं पवारांनी सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ