www.24taas.com, झी मीडिया, पुणे
एक लाख रुपये आणि दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय. पत्नीचे केस कापण्यावर या नराधमाचं समाधान झालं नाही... त्यानं तिचे नाक आणि कान कापून तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला.
मारुती निंबाळकर असं या नराधमाचं नाव आहे. १२ वर्षापूर्वी त्याचं पीडित महिलेशी लग्न झालं होतं. गेल्या सहा महिन्यांपासून मारुती आपला शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. सोमवारी मात्र त्यानं कहरच केला. पत्नीचे हातपाय बांधून त्यानं तिला बेदम मारहाण केली. एव्हढंच नाही तर केस, नाक आणि कान कापण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासांच्या झुंजीनंतर शेजारच्या काही महिलांनी या पीडित महिलेची नराधम पतीच्या तावडीतून सुटका केली.
या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मारुती निंबाळकरवर गुन्हा दाखल केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.