पुणे : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत गारद झाला. गेल्या ८५ वर्षातील भारताची कसोटीमधील ही सर्वात खराब कामगिरी आहे. पहिल्या डावात भारताने अवघ्या ११ धावांत तब्बल ७ गडी गमावले.
याआधी १९८९-९०मध्ये ख्राईस्टचर्चच्या मैदानावर भारताने १८ धावांत ७ गडी गमावले होते. त्यानंतर आता हे पुण्यात घडलेय. भारताची पहिल्या डावाची सुरुवातच अडखळत झाली.
पहिल्या सत्रात भारताचे तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य करत भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर सलामीवीर लोकेश राहुलने थोडाफार डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ते प्रयत्नही फोल ठरवले.
अखेरच्या ११ धावांत भारताचे ७ फलंदाज तंबूत परतले. पहिल्या डावात भारताच्या ६ फलंदाजांना केवळ एकेरी धावा करता आल्या. तर दोन फलंदाज शून्यावर बाद झाले.