नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आणखी ४०९ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून आफ्रिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्यात. हाशिम अमला २३ आणि एबी डेविलियर्स ११ धावांवर नाबाद आहेत.
अजिंक्य रहाणेचे नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या ८८ धावांच्या जोरावर भारताने दुसरा डाव २६७ धावांवर घोषित केला आणि आफ्रिकेसमोर ४८१ धावांचे मोठे आव्हान ठेवले. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना आफ्रिकेने चौथ्याच षटकांत डीन एल्गरच्या रुपाने पहिला गडी गमावला. टेम्बा बावुमाही फॉर्मात येत असतानाच अश्विनने त्याचा अडसर दूर केला. त्याने ३४ धावा केल्या. आफ्रिकेला अद्यापही विजयासाठी ४०९ धावा हव्या असून त्यांच्याकडे सोमवारचा अखेरचा दिवस शिल्लक आहे. तर भारताला या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी आठ विकेट हव्यात.
तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसअखेर भारताने १९० धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी या धावसंख्येत भारताने आणखी ७७ धावांची भर घातली आणि २६७ धावांवर डाव घोषित केला. विराटचे शतक अवघ्या १२ धावांनी हुकले.
पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.