झुरिच : जग प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू आणि अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीवर 4 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी घालण्यात आलेय. त्याला 10 हजार स्विस फ्रॅंकचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बंदीमुळे विश्वकरंडक पात्रता फेरीतील 5 सामन्यांपैकी 4 सामने अर्जेंटिनाला कर्णधाराविना खेळावे लागणार आहेत.
मेस्सीवर ही बंदी फिफाच्या शिस्तपालन समितीने घातली आहे. गेल्या आठवड्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी चिलीविरुद्ध झालेल्या विश्वकरंडक पात्रता फेरीच्या सामन्यात सहाय्यक पंचासोबत वाद हुज्जत घातली. या गैरवर्तन प्रकरणी फिफाच्या शिस्तपालन समितीकडून मेस्सीवर ही बंदी घालण्यात आली आहे.
मेस्सीवर बोलिव्हिया, उरुग्वे, व्हेनेझुएला आणि पेरू या संघांविरुद्धच्या सामन्यांना मेस्सी खेळू शकणार नाही. चिलीविरूद्धच्या या सामन्यात एका फाऊलवर सहाय्यक पंचाने फ्लॅग दाखवल्याने मेस्सी त्याच्यावर चांगलाच भडकला आणि अर्वाच्च भाषा वापरली. तसेच सामना संपल्यानंतर मेस्सीने सहाय्यक पंचांशी हस्तांदोलनही केलं नाही. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली.
दरम्यान, मेस्सीने पेनल्टी किकवर केलेल्या गोलच्या बळावर अर्जेंटिनाने चिलीचा 1-0 असा पराभव केला होता. मात्र मेस्सीवर टाकण्यात आलेली 4 सामन्याची बंदी अर्जेटिनासाठी मोठा धक्का आहे.