नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं आपण 'बीबीसीआय'कडे मदत मागितल्याच्या वृत्ताला नकार दिलाय. दानिशवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानं आजन्म बंदी घालण्यात आलीय.
'मिड डे' या वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, दानिशनं आपलं आयुष्य सावरण्यासाठी बीसीसीआयसमोर आपले हात पसरवले होते. बीसीसीआयकडे अपिल करत दानिशनं, 'भारतीय बोर्डानं मला स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपलं म्हणणं आयसीसीसमोर ठेवण्याची संधी द्यावी' अशी मागणी केली होती. इतकंच नाही तर आपलं आयुष्य आणि क्रिकेट वाचवण्यासाठी बीसीसीआय आपली मदत करू शकतं, असाही त्याला विश्वास आहे.
मी माझ्या उरल्यासुरल्या पैशांवर जगतोय.... पाकिस्तानात आता माझ्यासाठी काहीही राहिलेलं नाही, असं म्हणत या हिंदू वंशाच्या पाकिस्तानी खेळाडूनं बीसीसीआयकडे आपल्याला भारतीय खेळाडूंना स्पिन शिकवण्यासाठी संधी देण्याची मागणी केली होती. आपण पाकिस्तानात अल्पसंख्यांक असल्यानं आपल्या प्रकरणाची सुनावमी होत नसल्याबद्दलही त्यानं नाराजी यावेळी बोलून दाखवली होती.
परंतु, आपल्या म्हणण्यावर यूटर्न घेत दानिशनं आपण असं म्हटलंच नसल्याचा दावा केलाय. मी बीसीसीआयकडे कोणतीही मदत मागितलेली नाही... मीडियानं माझं म्हणणं चुकीच्या पद्धतीनं समोर मांडलं. मला पाकिस्तानी असल्याचा गर्व आहे, असं दानिशनं म्हटलंय.