‘फेसबुक’वर दहशतवाद्यांच्या भरतीचं दुकान

जगावर अधिराज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसला टार्गेट करणाऱ्या दहशतवाद्यांनी आता नवीन फंडा अवलंबिला आहे. त्यांनी आपले सभासद वाढविण्यासाठी भरतीचं दुकान उघडलंय. तेही फेसबुकवर. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करीत ही भरती सुरू केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 10, 2012, 04:31 PM IST

www.24taas.com,इस्लामाबाद
जगावर अधिराज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसला टार्गेट करणाऱ्या दहशतवाद्यांनी आता नवीन फंडा अवलंबिला आहे. त्यांनी आपले सभासद वाढविण्यासाठी भरतीचं दुकान उघडलंय. तेही फेसबुकवर. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करीत ही भरती सुरू केली आहे.
तालिबानने ‘फेसबुक’ या सोशल साइटवर आपले वेगळ ‘पेज’ तयार केले आहे. त्याद्वारे ‘तालिबानी’ तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार सुरू केला आहे. पाकिस्तानच्या ‘तहरीक-ए-तालिबान’ने नव्या दहशतवादी भरतीसाठी ही मोहीम हाती घेतली आहे.
फेसबुकवर पाकिस्तानच्या ‘तहरीक-ए-तालिबान’च्या पेजला २९० समर्थक लाभले आहेत. या पेजवर त्रैमासिक पत्रिकेसाठीचे लिखाण, इस्लामचा प्रचार करणारे व्हिडीओ पाठविण्याचीही विनंती तालिबानने केली आहे. तालिबानच्या पेजवरील ‘अयाह-ए-खिलाफत’मध्ये तसं आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘तालिबान’ने संदेशात संपर्कासाठीचा ईमेल आयडीही दिला आहे. याशिवाय या पेजवर तालिबानला फटकारणारी पाकिस्तानी मुलगी मलाला युसूफझाईवरील हल्ल्याचीही जबाबदारी स्वीकारली आहे.