www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
जगभरात आढळणाऱ्या गणरायाची विविध रुपं रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरूखमध्ये बघायला मिळताहेत. एक फेरफटका मारूयात देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईनचा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, गणरायाचं असं वर्णन होत असलं, तरी स्थळ-काळानुसार त्याची विविध रुपं बघायला मिळतात. या सगळ्या रुपांचा मेळ झालाय देवरूख कॉलेज ऑफ आट्सच्या गणेश दालनात.
वसंत तथा बाळासाहेब पित्रे यांनी १९५२मध्ये आर्थिक बाजू भक्कम नसतानही कॉलेजची मुहुर्तमेढ रोवली. आजघडीला हे कॉलेज कलादालन आणि रोजगाराचं साधन उभं राहिलंय. इथंच पित्रे सरांनी हे गणेश दालन साकारलंय.
इथं विविध प्रांत, देशांतल्या तब्बल दोनशे गणेशमूर्ती पहावयास मिळतात. एक इंचापासून तीन फुटापर्यतच्या मूर्ती या संग्रहात आहेत.
इथं येणारे पर्यटक गणरायाची ही रुपं पाहून मंत्रमुग्ध न झाले तरच नवल. पित्रे कुटुंबीयांनी या गणेश दालनासाठी अपार मेहनत घेतलीये. याचं प्रत्यंतर या दालनामध्ये पदोपदी येतं... सुटीत कोकणात जात असाल, तर देवरूखला जाऊन या गणेशदालनाचं दर्शन घ्यायला हरकत नाही.