www.24taas.com, झी मीडिया, अलिबाग
रायगड जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून महिला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. रोहा तालुक्यातील खाजणी गावात ही धक्कादायक घटना घडली. दिराला मदत केल्यामुळे ही मारहाण झाली. या महिलेवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी पोलीसांनी ३५४ ब कलम दाखल केलं आहे. तसंच १५ जणांना अटक केली आहे.
गावाने बहिष्कृत केलेल्या एका विधवा महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली आहे. या प्रकरणी रोहा पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली, असा आरोप महिलेने केला आहे. सध्या या महिलेवर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील काही लोकांनी सोमवारी रात्री विवस्त्र करून मारहाण केल्याचे तिने अलिबाग पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. गावचा पोलीसपाटीलही या प्रकरणात सहभागी होता, असे महिलेने म्हटले आहे.
पीडित महिला खाजणी गावात लहान मुलासोबत राहते. तिच्या कुटुंबावर गावाने बहिष्कार टाकला आहे. तिने याबाबत रोहे पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी ती तिच्या नातेवाईकांसोबत बोलली. त्यामुळे गावच्या प्रमुखांना याचा राग आला. सोमवारी रात्री विवस्त्र करून तीन तास पोलिस पाटलाच्या घरासमोर बसवले होते आणि मारहाण करण्यात आली, असे तिने जबाबात म्हटले आहे.
१५ जणांवर रोहा पोलीस ठाण्यात दंगल माजविणे, शांतता भंग, धमकी देणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांना २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात बहिष्काराच्या घटना वाढत असून आता महिलांनाही लक्ष्य करण्यात येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. पोलीस का बघ्याची भूमिका घेत आहेत, अशी प्रक्रिया उमटत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ