www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ कोकणातच नव्हे, तर महाराष्ट्रभर वादावादी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील आपापसातील वाद विकोपाला गेले असून, पक्षाध्यक्ष शरद पवारांना ही वादावादी थांबवताना नाकी नऊ येणार आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या आधीच शरद पवारांच्या पक्षात एकमेकांचे पाय खेचण्याचे उद्योग जोरात सुरू झालेत. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भास्कर जाधव यांना रत्नागिरी जिल्ह्यात जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिलेलं आव्हान हे केवळ एक उदाहरण आहे.
राष्ट्रवादीचे दुसरे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनाही ठाणे जिल्ह्यात उपसभापती वसंत डावखरे आणि राज्य उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी आव्हान उभं केलंय. वरवर सगळे गोड असल्याचं भासवलं जात असलं तरी तिघांमधील गटबाजी सर्वज्ञात आहे. ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्यावरून आव्हाड यांनी उपोषण सुरू केलं, तेव्हा डावखरे तिकडे फिरकले देखील नाहीत. तर आव्हाडांचं उपोषण सुटावं, यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कथित निरोप घेऊन गणेश नाईक गेले आणि त्यांनी आव्हाडांना उपोषण सोडायला भाग पाडलं.
सांगली जिल्ह्यात गृहमंत्री आर. आर. पाटील आणि विधान परिषद आमदार संजय पाटील यांच्यात उघड वाद सुरू झालेत. संजय पाटील यांनी तासगाव साखर कारखाना विकत घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनात आर. आर. आबांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मराठवाड्यात सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर विरूद्ध बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित अशी गटबाजी रंगलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून टोकाची भूमिका घेणारे आ. विनायक मेटे आणि क्षीरसागर यांचेही फारसे पटत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादानं धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आले खरे, परंतु बीड जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते आणि नेते धनंजय मुंडेंच्या विरोधात आहेत.
नागपूरमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख आणि माजी आमदार रमेश बंग यांच्यात बेदिली आहे. मध्यंतरी अनिल देशमुखांना डच्चू देऊन बंग यांना मंत्रीपद देण्यात आले. तेव्हापासून दोघांमधून विस्तवही जात नाही. गेल्या निवडणुकीत हिंगणा मतदारसंघात बंग यांच्या पराभवाला अनिल देशमुख जबाबदार असल्याचा आरोप अजूनही केला जातोय.
सिंधुदुर्गमध्ये दीपक केसरकर यांच्याशी झालेल्या वादानंतर संदेश पारकर यांनी काँग्रेसची वाट धरली. परभणीमध्ये शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान विरूद्ध सुरेश वरपूडकर, नांदेडमध्ये माजी मंत्री सूर्यकांता पाटील विरूद्ध कमलकिशोर कदम अशा वादाच्या ठिणग्या सुरूच आहेत.
ही सुंदोपसुंदी लक्षात घेता हा राष्ट्रवादी पक्ष आहे की वादावादी पक्ष आहे, असा सवाल निर्माण होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.