नाच रे मोरा...

पावसाच्या सरींनी शेतीशिवारात सगळीकडे आनंद पसरलाय... मोरही अशा वातावरणात नृत्य करुन आनंदोत्सव साजरा करतायत...

Updated: Aug 18, 2013, 09:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, शिवतर
पावसाच्या सरींनी शेतीशिवारात सगळीकडे आनंद पसरलाय... मोरही अशा वातावरणात नृत्य करुन आनंदोत्सव साजरा करतायत...
मनमोहक आणि लोभसवाणं नृत्य करणारे मोर डोळ्याचं पारणं फेडतात.. आभाळात मेघ दाटून आले की मोकळ्या रानात मोराचं नृत्य प्रत्येकालाच भुरळ घालतं.. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधल्या शिवथर तालुक्याची बातच न्यारी... गेल्या आठ-दहा वर्षात शिवतर गावाची मोरगाव अशी ओळख बनू लागलीय.. कारण श्रावणाची चाहूल लागताच मोर अगदी न चुकता या गावात हजेरी लावतात.. श्रावणात मोरांची स्वारी गावात येते आणि महिनाभर गावाच्या कुटुंबातील सदस्य बनून राहते... हिंडता फिरता मनसोक्त नाचणारे मोर नजरेस पडतात... हे दृष्य पाहून मन प्रफुल्लित झालं नाही तरच नवल... या मोरांची गावातल्या प्रत्येकाशी अशी काही गट्टी जमते की गावातल्या महिलांकडून बिस्किटांची हौससुद्धा ते पूर्ण करुन घेतात...
श्रावण महिन्यात येणा-या या पाहुण्यांचं आदरातिथ्य करताना ग्रामस्थ कोणतीही कसूर सोडत नाहीत.. महिनाभर त्यांची ते काळजी घेतात.. मोरांच्या आगमनामुळे गावात चोहीकडे समाधानाचं वातावरण पसरतं...
सिमेंटच्या जंगलात मोरांचं दर्शन दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललंय.. मात्र पिसारा फुलवत थुईथुई नाचणा-या मोरांचं जवळून दर्शन घ्यायचं असेल तर शिवतर अर्थात मोरांच्या गावाला आवर्जून भेट द्या....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.