मध्य प्रदेशात पुन्हा भाजपला कौल, विजयाची हॅटट्रिक!

मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने आपला करीष्मा दिसून आलाय. मतदारांनी भाजपलाच कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजयाची हॅटट्रिक भाजप साधणार असेच दिसतेय. १३४ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची बहुमताकडे सध्यातरी वाटचाल दिसून येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 8, 2013, 10:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
मध्य प्रदेशच्या जनतेनं तिस-यांदा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हातात सत्ता दिलीय. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या अनपेक्षितरीत्या सतरा जागा वाढल्या आहेत तर काँग्रेसला गेल्या वेळच्या जागाही कायम राखता आलेल्या नाहीत.
मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांनी सत्तेची हॅटट्रीक लगावलीय. एवढंच नव्हे तर चौहानांनी सर्वांना धक्का देत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त जागा काबिज केल्या आहेत. त्यामुळं गेल्या दहा वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसचा वनवास आणखी पाच वर्षांनी लांबलाय.
केंद्रातल्या काँग्रेससरकारमधील भ्रष्टाचाराचे मुद्दे आणि महागाई काँग्रेसला भोवलेली दिसते. काँग्रेसचे नेतृत्व असलेल्या ज्योतिरादित्यांसोबत ज्येष्ठ नेते दिग्विजय, कमलनाथ, कांतिलाल भुरियांची एकवाक्यता नव्हती. केंद्राकडून सापत्नेच्या वागणुकीचा मुद्दा भाजपनं जोरदार लावून धरला होता.
त्याचा काँग्रेसकडून म्हणावं तसं प्रत्युत्तर देता आलं नाही. त्यामुळं काँग्रेसला गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागाही कायम राखता आलेल्या नाहीत. या वादळात माजी केंद्रीयमंत्री सुरेश पचौरी यांनाही दणदणीत पराभावाला सामोरं जावं लागलंय.
तर भाजपची मदार शिवराजसिंह चव्हाण यांच्या प्रतिमेवर होती. शिवराजसिंह यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकास कामांचं मार्केटिंग मोठ्या खुबीनं केलं. त्यांनी राबवलेल्या योजना जनतेत चांगल्याच लोकप्रिय झाल्या. अटल ज्योती अभियाना अंतर्गत २४ तास वीज पुरवठा. लाडली योजने अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल आणि गरीब मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत. ग्रामीण भागात रस्त्यांचं उभं केलेलं जाळं भाजपला तिस-यांदा सत्तेवर येण्यास पुरेशा ठरल्या. लोकसभा निवडणुकीतही अशी विजयी घोडदौड सुरू ठेवण्याचा निर्धार मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.
ज्या विजयी हॅटट्रीकच्या जोरावर गुजरातचे मुख्यमंत्री भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले, त्याचीच पुनरावृत्ती शिवराजसिंह चौहान यांनी केलीय. मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असले तरी या विजयामुळं चौहान यांच्या रुपानं नव्या ओबीसी चेह-याचा पर्याय भाजपसाठी उभा राहिलाय.
........
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे दोन मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. बुधनी या मतदार संघातून त्यांनी डॉ. महेंद्रसिंग चौहान यांचा ८४,८०५ मतांनी पराभव केला. तर पारंपरिक मतदार संघ विदीशामधून त्यांनी शशांक भार्गव यांना १६,९६६ मतांनी मत दिली
बिग फाइट
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांचे पुत्र अजय सिंह यांनी चुरहट मतदार संघातून शिरदेंदू तिवारी यांना १९,२५६ मतांनी मात दिलीय.
तर भोपाळ जवळच्या भोजपूर मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांचा माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे पुतणे सुरेंद्र पटवा यांनी २०,१४९ मतांनी पराभव केला. पटवा कुटुंबियांचा हा पारंपरिक मतदार संघ असला तरी ते मूळचे उज्जैनचे असल्यामुळं पचौरींनी भूमीपुत्राचा मुद्दा प्रचारात लावून धरला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.