झोपण्यापूर्वी मेकअप उतरवूनच झोपा, नाहीतर...

कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना, पार्टीला जाताना किंवा आणखी कार्यक्रमांसाठी आपण निघतो तेव्हा आपला लूक थोडा हटके असायला हवा, यासाठी अनेक जण आग्रही असतात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 4, 2014, 08:08 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना, पार्टीला जाताना किंवा आणखी कार्यक्रमांसाठी आपण निघतो तेव्हा आपला लूक थोडा हटके असायला हवा, यासाठी अनेक जण आग्रही असतात. यासाठी हलकासा मेकअपही केला जातो. दिवसभर तुम्ही मेकअप करून फिरत असाल तरी रात्री झोपताना मात्र हा मेकअप उतरवायलाच हवा. त्यामुळे तुमच्या त्वचेचा टवटवीतपणा टिकून राहतो.
मेकअप न उतरवल्याचे दुष्परिणाम...
त्वचारोगापासून रक्षण होण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे. झोपण्यापूर्वी चेहर्‍यावरील मेकअप न काढल्यास तो चेहर्‍यासाठी अपायकारक ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. रात्री चेहर्‍याच्या त्वचेतून तेलकट पदार्थ स्रवत असतो. अशा स्थितीत तेलकट पदार्थ मेकअपशी एकरूप झाल्याने याचे अनेक दुष्परिणाम दिसतात.
रात्रीच्या वेळी त्वचा जलद रिकव्हरीच्या स्थितीत असते. म्हणजे हानी पोहोचलेल्या पेशींच्या जागी नव्या पेशी येतात आणि नव्या पेशी विकसित होत असतात. ही प्रक्रिया त्वचेसाठी महत्त्वाची असते. रात्री चेहर्‍यावर मेकअप असल्यास ही प्रक्रिया बाधित होते. परिणामी त्वचा निस्तेज आणि सुरकुत्या असल्या सारखी दिसते.
झोपताना चेहर्‍यावर फाउंडेशन, पावडर किंवा ब्लश लावलेला असल्यास त्वचेच्या नैसर्गिक तजेलपणाला नुकसान पोहोचते. याच्यामुळे त्वचा निस्तेज होत सुरकुत्या येण्याची प्रक्रिया सुरू होते. अवेळी वयस्क होण्याचा धोका त्यामुळे निर्माण होतो.
आपण दिवसातून हजारदा आपल्या चेहर्‍याला हात लावत असतो. अशाने अजाणतेपणे अनेक अपायकारक बॅक्टेरिया किंवा धुलीकण चेहर्‍याला चिकटतात. झोपताना चेहरा साफ न केल्यास मेकअप, धुळीचे कण आणि त्वचेतून निघणार्‍या तेलकट पदार्थामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होतात. अशाने चेहर्‍यावर मुरूम किंवा काळ्या डागांची समस्या निर्माण होते.
त्वचेवर असणार्‍या रंद्रांमुळे घाम येणे आणि सिबमची निर्मिती या क्रिया होत असतात. सिबम हा असा तेलकट पदार्थ आहे, जो त्वचेतील तजेलदारपणा टिकवणे आणि सुरक्षा देण्याचे काम करतो. त्याचप्रमाणे मृत पेशींना हटवण्यात मदतीचा ठरत असतो. मेकअप स्वच्छ न केल्यास रंद्रे बंद होतात आणि सिबमची कार्यप्रणाली प्रभावित होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.