नंदुरबार : उत्तर महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात अर्भक आणि मातांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनंतर प्रशासनाची झोप उडवली आहे. तर आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
नुकतच नाशिक विभागातील आरोग्य उपसंचालकांकडून जिल्हानिहाय माता आणि अर्भकांच्या मृत्यूचा आढावा घेण्यात आला. मिळालेली आकडेवारी पाहिल्यावर पायाखालची जमीन सरकली.
जानेवारी ते जून 2022 या 6 महिन्यांत नंदुबार जिल्ह्यात 86 अर्भक आणि 10 मातांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
अर्भक आणि मातांचा मृत्यूची कारणं ?
प्रसुतीदरम्यान गर्भवती महिलांमध्ये रक्त कमी असणे, रक्तस्त्राव, विषाणूची बाधा आणि गर्भाशयात रक्तस्त्राव या कारण्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात कुपोषण, शरीरात रक्ताची कमी, बालविवाह आणि अशिक्षितपणा याही कारणांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. तरीही या जिल्ह्यातील अर्भक आणि मातांचा मृत्यूचे प्रमाण थक्क करणारे आहे.
आरोग्य विभागाच्या या आकडेवारीमुळे नंदुरबार जिल्ह्याची काळीकुट्ट बाजू समोर आली आहे. केंद्र सरकारकडून माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील ही आकडेवारी पाहता या योजनांच्या नावे तोंडाला पानं पुसली जात आहेत असं दिसतं. गेल्या 6 महिन्यातील ही आकडेवारी लक्षात घेता अर्भक आणि मातांचा मृत्यूला कोण जबाबदार आहे, हा प्रश्न उपस्थित होतो.