मुंबई : प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी नवीन कार विकत घेतली आहे. आधीची कार त्यांनी ७-८ वर्षे वापरल्यानंतर त्यांनी नवीन कार घेतली आहे. परंतु नवीन कार घेताना कोणती कार घ्यावी असा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. त्यांचे सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्व पाहता त्याप्रमाणे परदेशी शानदार ब्रॅंडची कार खरेदी करावी असा सल्ला त्यांना मित्रांनी दिली. असे असले तरी कोल्हे यांनी आपल्या मनाचा सल्ला ऐकला आणि टाटा समुहाची कार खरेदी केली.
खासदार अमोल कोल्हे यांनी टाटा मोटार्स कंपनीची हैरिअर खरेदी केली आहे. ही कार खरेदी केल्यानंतर त्यांनी आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. टाटा उद्योग समुहाची कार त्यांनी का खरेदी केली यासंबधीचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला. त्यांच्या व्हिडिओने चाहत्यांची नक्कीच मनं जिंकली.
टाटा उद्योग समुहाने कोविड काळात केलेले सामाजिक कार्य उल्लेखनिय आहे. समाजाच्या मदतीसाठी त्यांनी हजारो कोटींची मदत केली. त्यामुळे या उद्योगसमुहाची कार खरेदी केली असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.
त्यासोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यातही टाटा ग्रुपचा मोठा वाटा राहिला आहे. असंही त्यांनी यावेळी म्हटले.
टाटा उद्योगसमुह नेहमीच समाजासाठी अग्रेसर असतो. रतन टाटा शैक्षणिक शिष्यवृत्तीचा कोल्हे यांच्या शिक्षणात महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे टाटा उद्योग समुहाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी टाटा हैरिअर कार खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.
रतन टाटा देशाची शान आहेत. ते प्रत्येक भारतीयाची प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी त्यांचे प्रोडक्ट जागतिक दर्जाचा बनवले आहे. मी ही आज त्या प्रोडक्टचा ग्राहक बनलो असल्याचे खासदार कोल्हे यांनी म्हटले.