मुंबई : महाशिवरात्रीचे पर्व यंदा १३ आणि १४ फेब्रुवारीला आहे. खरंतर फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री असते. मात्र यावर्षी १३ आणि १४ फेब्रुवारीला या दोन दिवशी मध्यरात्री हे पर्व असेल. १३ फेब्रुवारीला रात्री १०.३४ पासून चतुर्दशी सुरू होईल आणि १४ फेब्रुवारी रात्री १२.४७ मिनीटांपर्यंत असेल. म्हणजे १४ फेब्रुवारीला पूर्ण दिवश चतुर्दशी असेल. असे बोलले जाते की, महाशिवरात्रीच्या मध्यरात्री भगवान शंकरांच्या ब्रम्हा रुपाचे अवतरण झाले. भगवान शंकर भोळे असून ते अगदी सहज प्रसन्न होतील, असे बोलले जात आहे. मात्र लवकर प्रसन्न होण्याबरोबरच ते लवकर नाराज देखील होतात. म्हणून शिवरात्रीचे उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे यादिवशी चुकूनही काळे कपडे परिधान करू नका.
शिवच्या भक्तांनी एक लक्षात घ्यावे की, शिवरात्रीचा उपवास असेल तर सकाळी लवकर उठा आणि गरम पाण्याने अंघोळ करा. त्यामुळे शरीराची अशुद्धी दूर होईल. यादिवशी नवीन वस्त्र धारण करायला हवे असे काही नाही. मात्र स्वच्छ, शुभ्र वस्त्र जरुर घाला. तसंच भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी चुकूनही काळे कपडे घालू नका. भगवान शंकराला काळे कपडे पसंत नसल्याची समजूत आहे. त्याचबरोबर शिवलिंगावर चढवलेला प्रसाद खावू नका. त्यामुळे दुर्भाग्य येते. धनहानी आणि आजार होण्याची शक्यता असते.
पूजा करताना भगवान शंकराला लाल रंगाचे फूल वाहू नका. त्याचबरोबर केवडा वाहू नका. पूजा करताना तुळस, तीळ वाहणे वर्ज्य आहे. तुटलेले तांदूळ, नारळाचे पाणी शिवलिंगावर वाहू नका. तसंच शिवलिंगावर हळद-कुंकूही वाहू नका. बेलाचे पान वाहताना त्याला तीन पाने असणे गरजेचे आहे.