Holi 2024 : अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण आला आहे. खरं तर देशभरात होळीचा उत्साह प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्यात येतो. काही राज्यांमध्ये होळीचा उत्साह सुरु झाला आहे. पण भारतातील एक गाव असं आहे जिथे एक भयान शांतता दिसून येत आहे. तुम्हाला जाणून आश्चर्यचकित व्हाल पण याठिकाणी रंगांची होळी खेळली जाते. मात्र या गावातील गावकरी होलिका दहन या नावानेच घाबरतात. या गावात तब्बल 400 वर्षांपासून होलिका दहन झालं नाही. यामागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
आम्ही बोलत आहोत, हे गाव भारतातील मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील हातखोह या आदिवासी गावाबद्दल. या गावात होलिका दहनाचं नाव घेतली की गावातील लोक थरथर कापतात. त्यांचा असा समज आहे की, होलिका दहन केल्याने गावावर संकट कोसळतं. या गावात झारखंडन मातेचं मंदिर आहे. या गावातील आदिवासी या मातेला खूप मानतात. या गावात होलिका दहन केल्यास माता झारखंडन नाराज होते असा त्यांचा विश्वास आहे.
या गावातील काही लोकांनी काही वर्षांपूर्वी विरोध असतानाही होलिका दहन केलं. गावात अचानक सोसाट्याचा वारा सुटला. गावातील प्रत्येक घराला आग लागली. अगदी या आगीत शेतही भस्म झालं. तेव्हा असं म्हटलं गेलं की, देवी नाराज झाली आणि तिच्या कोपामुळे गावाला आणि शेताला आग लागली असं गावातील लोक सांगतात. या महासंकटातून मुक्ती मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी मंदिरात मातेकडे धाव घेतली. त्यांनी प्रार्थना केली की पुन्हा या गावात कधीही होलिका दहन होणार नाही. आमची चूक पदरात घे. या घटनेनंतर गावात आजही होलिका दहन होतं नाही, असं गावकरी सांगतात.
या गावात 250 आदिवासी कुटुंब राहतात. त्यांचा समज आहे की, होलिका दहन केल्यास माता गावातून निघून जाईल. झारखंडन मातेचे मंदिर गावातील घनदाट जंगलात आहे. ही देवी स्वतः प्रकट झाली असून जंगलाच्या मध्यभागी तिची एक छोटी मूर्ती आहे. मंदिराचे पुजारी छोटेभाई यांनी सांगितलं की, गावातील एका वडीलधाऱ्याला स्वप्नात मातेने दर्शन देऊन सांगितलं की, माता गावाजवळच्या घनदाट जंगलात आहे. त्या व्यक्तीने सांगितल्यावर गावातील लोकांनी जंगलात शोध घेतला आणि त्यांना ही मूर्ती सापडली. हळूहळू गावातील सर्व लोक देवीची पूजा करु लागली आणि कालांतराने इथे मातेचं मंदिर उभारलं. या देवीची गावाबाहेरही चर्चा होऊ लागली आणि त्याच्या दर्शनाला आजूबाजूच्या गावातून भक्त यायला लागले.