IPL 2025 पूर्वी, BCCI ने घेतला मोठा निर्णय, 'हा' महत्त्वपूर्ण नियम केला रद्द

IPL 2025:  बीसीसीआयने सोमवारी हा मोठा निर्णय घेतला आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 14, 2024, 10:58 PM IST
IPL 2025 पूर्वी, BCCI ने घेतला मोठा निर्णय, 'हा' महत्त्वपूर्ण नियम केला रद्द  title=
Photo Credit: BCCI

Impact Player Rule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी मोठा निर्णय घेतला. बोर्डाने IPL 2025 च्या आधी देशांतर्गत T -20 स्पर्धेतील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) मधून इम्पॅक्ट प्लेयर नियम काढून टाकला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधून हा नियम हटवला जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) हा नियम कायम राहणार आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल फ्रँचायझींना कळवले होते की हा नियम आयपीएलच्या पुढील हंगामासाठी कायम ठेवण्यात येईल.

काय आहे हा नियम? 

इम्पॅक्ट प्लेयर  नियमानुसार, संघ नाणेफेक करण्यापूर्वी 4 पर्यायी खेळाडूंची नावे देतात. यापैकी कोणताही एक खेळाडू सामन्यादरम्यान वापरला जाऊ शकतो. मात्र, संघाला डावाच्या 14व्या षटकाच्या आधी इम्पॅक्ट प्लेयरचा वापर करू शकता. या नियमानुसार, खेळाडूला बाहेर जावे लागत होते आणि त्याच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर मैदानात येत होता.  यानंतर बाद झालेल्या खेळाडूला सामन्यादरम्यान पुन्हा समाविष्ट करता येत न्हवते. 

हा नियम कधी वापरला जातो?

षटक संपल्यानंतर, विकेट पडल्यानंतर किंवा खेळाडूला दुखापत झाल्यामुळे इम्पॅक्ट प्लेयरला मैदानावर आणता येते. हा नियम सामन्याच्या मध्यात वापरता येत नाही. आधीच फलंदाजी केलेल्या फलंदाजाच्या जागी इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला जाऊ शकतो किंवा गोलंदाजाने त्याची ओव्हर पूर्ण केल्यावर इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला जाऊ शकतो. 

'हे' लक्षात घ्या 

जर सामना 10 किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा असेल तर इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू होत नाही. कोणत्याही संघाला हा नियम पाळण्याचे बंधन नव्हते. या नियमामुळे संघाला एक अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज मिळत होता. जर एखाद्या खेळाडूचा दिवस खराब असेल तर प्रभाव इम्पॅक्ट प्लेयर काही प्रमाणात भरपाई करत होता. 

कधी पासून सुरु होणार स्पर्धा?

सय्यद मुश्ताक अली स्पर्धा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून १५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबद्दल बीसीसीआयने म्हटले आहे की, "बीसीसीआयने या हंगामात 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे." सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोलंदाजांना एका षटकात दोन बाऊन्सर टाकण्याची परवानगी देण्याचा निर्णय बोर्डाने कायम ठेवला आहे.