'यामागील खरी गोष्ट समोर आली पाहिजे,' भारत-पाक सामन्याचा उल्लेख करत गावसकरांनी उपस्थित केली शंका

आशिया कपच्या आयोजनाची जबाबदारी यावेळी पाकिस्तानकडे असून हायब्रीड मॉडेलवर सामने खेळवले जात आहेत. पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर  भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत.   

शिवराज यादव | Updated: Sep 8, 2023, 07:31 PM IST
'यामागील खरी गोष्ट समोर आली पाहिजे,' भारत-पाक सामन्याचा उल्लेख करत गावसकरांनी उपस्थित केली शंका title=

आशिया कप सध्या सुरु असून, यावेळी पाऊस सामन्यांमध्ये व्यत्यय आणत असल्याने अनेक क्रिकेटसिक नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनीही यावर आपलं मत मांडताना शंका व्यक्त केली आहे. आशिया कपच्या सुपर 4 फेरीतील सामने कोलंबोत न खेळवता हंबनटोटा येथे हलवले का जात नाही आहेत? यामागील खरी गोष्ट कोणीतरी शोधायला हवी असं ते म्हणाले आहेत. पावसाचा फटका अनेक सामन्यांना बसला असून, भारत-पाकिस्तान सामनाही अनिर्णित राहिला. सुनील गावसकर यांनी यावर बोलताना, जेव्हा सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय होतो तेव्हा खेळाडूंनी मोठा दृष्टीकोन ठेवायला हवं असं सांगितलं आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आशिया चषक आयोजित केला जात असून 'हायब्रीड मॉडेल'वर सामने खेळले जात आहेत. भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानंतर भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्यात येत आहेत. दरम्यान, कोलंबोत या आठवड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर सामने हंबनटोटा येथे खेळवले जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण यानंतर एशियन क्रिकेट काऊन्सिल मात्र ठरलेल्या ठिकाणीच सामने खेळण्यावर ठाम आहे. यामुळे सुनील गावसकर मात्र थोडे संतापले आहेत. 

"कोणीतरी यामागील खरी गोष्ट शोधण्याची गरज आहे. मला वाटत आहे कदाचित क्रिकेटर्सची हंबनटोटाला जाण्याची इच्छा नाही. त्यामुळेच प्रशासकांना, कोलंबोमध्ये हवामान फार खराब असू शकते हे माहित असतानाही, शेवटच्या क्षणी हंबनटोटात न खेळता कोलंबोत खेळवावं लागणार आहे," असं सुनील गावसकर यांनी 'स्पोर्ट्स टुडे'शी बोलताना सांगितलं.

दरम्यान सुनील गावसकर यांनी यावेळी आपण कोणत्याही ठराविक देशाच्या खेळाडूंबद्दल बोलत नसल्याचं स्पष्ट केलं. "जेव्हा मी खेळाडू असं म्हणतो, तेव्हा एखाद्या ठराविक संघाचे नाही तर सर्व संघाचे खेळाडू तिथे असले पाहिजेत," असं गावसकरांनी सांगितलं.

सुनील गावसकर यांनी यावेळी प्रशासकांप्रती सहानुभूतीदेखील व्यक्त केली. चांगले आणि दर्जेदार सामने पाहायला न मिळाल्यास चाहते त्यांनाच टार्गेट करत असतात. ते म्हणाले की "प्रशासकांकडे बोट दाखवणं तसं फार सोपं आहे. त्यांना सहज बळीचा बकरा बनवलं जाऊ शकतं. पण कोलंबोत हवामान चांगलं नाही हे माहिती असतानाही ते हंबनटोटात येथे सामने का खेळवत नाही आहेत याची माहिती मिळवणं गरजेचं आहे".

सामन्याच्या वेळापत्रकात खेळाडूंचं म्हणणंही समजून घ्यावं याला सुनील गावसकरांचा विरोध नाही. मात्र खराब हवामानासारख्या काही अनपेक्षित स्थितींशी त्यांनी जुळवून घ्यायला हंव अशी त्यांची इच्छा आहे.

दरम्यान 10 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघ आमने-सामने आले असता पावसामुळे सामना अनिर्णित राहिला होता. "खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली राहावी असं प्रत्येकाला वाटतं. जीम, प्रॅक्टिसच्या सुविधा चांगल्याच हव्यात. मात्र अशा स्थिती तुम्ही मोठा दृष्टीकोन ठेवायला हवा. कोलंबोच्या तुलनेत हंबनटोटा येथे पावसाची शक्यता कमी आहे." असं गावसकर म्हणाले आहेत.

"वेगवेगळे प्रयोग करा असं मी म्हणतो तेव्हा तुम्हाला वर्ल्डकपसाठी तयारी करण्याची संधी असते. पण याचा अर्थ मी आशिया कप कमी महत्त्वाचा आहे असं अजिबात म्हणत नाही. ही स्पर्धाही आपण जिंकायला हवी," असं गावसकरांनी सांगितलं आहे.