सरफराजची 'विकेट' जाणार! हा खेळाडू पाकिस्तानचा कर्णधार व्हायची शक्यता

श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात झालेला पराभव पाकिस्तानी चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे.

Updated: Oct 18, 2019, 10:01 AM IST
सरफराजची 'विकेट' जाणार! हा खेळाडू पाकिस्तानचा कर्णधार व्हायची शक्यता title=

लाहोर : श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात झालेला पराभव पाकिस्तानी चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानी टीमचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकदेखील कर्णधार सरफराजच्या कामगिरीमुळे नाराज आहे. याबाबत मिसबाहने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांच्याशी चर्चा केली आहे. यानंतरच सरफराजकडून कर्णधारपद काढून घेतलं जाईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

पाकिस्तान आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात अजहर अली पाकिस्तानी टेस्ट टीमचा कर्णधार होऊ शकतो, तर विकेट कीपर बॅट्समन मोहम्मद रिझवानकडे उपकर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३ नोव्हेंबरपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे.

सरफराज टीमचा कर्णधार राहू शकत नाही, असं मिसबाहने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण याबाबत बोर्ड संभ्रमात आहे. ऑस्ट्रेलियासारख्या महत्त्वाच्या दौऱ्यात नव्या कर्णधाराची निवड करणं धोक्याचं ठरू शकतं, असं पीसीबीला वाटत आहे.

मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटसाठी मोहम्मद हफीजचं नाव समोर येत आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देऊन प्रयोग केला जाऊ शकतो. कामगिरी खराब राहिली तर टीम बदलातून जात असल्याचं कारण देता येऊ शकेल, असं टीम प्रशासनाला वाटत आहे.