'मी सुद्धा त्याच्यासारखा...', विराटबरोबरच्या तुलनेसंदर्भात बाबर स्पष्टच बोलला; पाहा Video

Babar Azam On Comparison With Virat Kohli: विराट कोहली आणि बाबर आझम यांची अनेकदा तुलना केल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता यावर बाबरनेच पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 15, 2024, 08:10 AM IST
'मी सुद्धा त्याच्यासारखा...', विराटबरोबरच्या तुलनेसंदर्भात बाबर स्पष्टच बोलला; पाहा Video title=
एका मुलाखतीत केलं विधान

Babar Azam On Comparison With Virat Kohli: भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम यांची अनेकदा तुलना केली जाते. पाकिस्तानी आणि भारतीय चाहते अनेकदा या दोघांची तुलना करताना दिसतात. बाबर सर्वोत्तम आहे की विराट कोहली यावरुन सोशल मीडियावर तर कायम चाहत्यांमध्ये वाद सुरु असल्याचं दिसून येतं. विराट छान खेळतो की बाबर यासंदर्भातील अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी तयारी करत आहे तर दुसरीकडे बाबर आझमला सुमार कामगिरीमुळे पाकिस्तानच्या कसोटी संघातूनच वगळण्यात आलं आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू चर्चेत आहेत. असं असतानाच आता बाबरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विराट कोहलीबरोबरच्या तुलनेवर भाष्य केलं आहे. 

अनेकांशी बाबरची तुलना

बाबर आझमला सध्या सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत आहे. विशेष म्हणजे या कारणामुळे त्याला अगदी पाकिस्तानच्या संघातून तात्पुरता डच्चू देण्यात आला आहे. असं असतानाच त्याने भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक विषयांवर भाष्य केलं. मात्र हर्षा यांनी मुलाखतीदरम्यान विराट कोहलीबरोबरच्या तुलनेसंदर्भात प्रश्न विचारला असता बाबरने दिलेल्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. खरं तर यापूर्वीही तुम्ही अनेकदा बाबर आझमची भारतातील अनेक क्रिकेटपटूंशी तुलना झाल्याचे व्हिडीओ पाहिले असतील. अगदी विराटपासून ते अगदी आता नावाजलेल्या शुभमनपर्यंत अनेकांशी बाबरची तुलना झाली आहे. मात्र त्यातही त्याची सर्वाधिक वेळा विराटशी तुलना होता. याचसंदर्भात त्याला हर्षा यांनी थेट प्रश्न विचारला.

बाबर काय म्हणाला?

"तुला अनेकदा ए. बी. डिव्हिलिअर्ससंदर्भात नाही तर विराट कोहलीबद्दल विचारलं जातं," असा प्रश्न हर्षा यांनी 'क्रिकबझ'साठी घेतलेल्या मुलाखतीत विचारला असता बाबर आझम हसला. त्यानंतर प्रश्नाला उत्तर देताना, "लोक तुलना करतात म्हणून मला प्रश्न विचारले जातात. माझ्या मते तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मला अजून या खेळात भरपूर काही मिळवायचं आहे. मी सुद्धा त्याच्यासारखा खेळाडू व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी सुद्धा माझ्या संघाला सामने जिंकून द्यावे आणि खूप सारे विक्रम आपल्या नावावर करावेत असं मला वाटतं," असं बाबरने सांगितलं.  

अनेकांनी केलं बाबरचं कौतुक

सध्या सोशल मीडियावर बाबरचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याने विराटचं कौतुक केल्याचं पाहून अनेक भारतीय चाहत्यांनी या तुलनेमध्ये कधीच बाबरचा अपमान करण्याचा हेतू नसतो केवळ पाकिस्तानी चाहते तुलना करतात म्हणून आकडेवारी दाखवावी लागते असं मत मांडलं.