नवी दिल्ली : आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांची भेट घेतली. या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेत भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिजशी संबंधित मुद्दयावरही चर्चा झाली.
बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी आणि जनरल मॅनेजर प्रो. रत्नाकर शेट्टी यांनी तब्बल ४५ मिनिटे क्रीडा मंत्री राठोड यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत अनेक मुद्द्यांव्यतिरिक्त बोर्ड अधिकाऱ्यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेटबाबतही क्रीडामंत्र्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या मते पाकिस्तानविरुद्ध खेळणे अथवा न खेळणे हा केवळ क्रीडा मंत्रालयाचा निर्णय नसेल तर मुख्यत्वेकरुन हा निर्णय पीएमओ आणि गृहमंत्रालयाचा असेल. २०१९मधील आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची घोषणा होणे बाकी आहे. यात जगातील ९ देशांचा समावेश असणार आहे.
२०१२-२०१३मध्ये दोन्ही देशांदरम्यान मर्यादित षटकांची क्रिकेट सीरिज झाल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध एकही द्वपक्षीय सीरिज खेळलेली नाही. आयसीसीच्या एफटीपी(फ्युचर टूर प्रोग्राम) अंतर्गत सदस्यत्व मिळालेल्या देशांना प्रत्येक देशाविरिद्ध एक सीरिज खेळावी लागेल. यात जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीरिज झाली नाही तर दोन्ही देश आपापले गुण गमावतील.