काय सांगताय काय... Team India पाकिस्तानात जाणार? PCB ने तयार केला प्लॅन B

Sending Indian Team To Pakistan: सध्या भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी खेळण्याच्या तयारीत असतानाच पाकिस्तानसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.  

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 26, 2023, 11:42 AM IST
काय सांगताय काय... Team India पाकिस्तानात जाणार? PCB ने तयार केला प्लॅन B title=
भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार?

Sending Indian Team To Pakistan: दुबईमधील अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्यालयामध्ये पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झाका अशरफ आणि आयसीसीचे जनरल काऊन्सिलचे जॉनथन हॉल हे दोघेही यावेळेस उपस्थित होते. मात्र एकीकडे या कराराची चर्चा असतानाच दुसरीकडे चर्चा मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची म्हणजेच बीसीसीआयची होती. बीसीसीआय या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्याच्या तयारीत नसल्याचं समजतं.

दोघांमध्ये झाली चर्चा

झाका अशरफ आणि एमिरट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खलिद अल झारुनी या दोघांमध्ये झालेल्या चर्चेमध्येही भारताचा उल्लेख आला. भारताने चॅम्पियन्स चषक 2025 मध्ये सहभाग घेण्यासाठी पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर काही सामने युएईमध्ये भरवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. थेट कधी आणि कसं हे नियोजन केलं जावं याबद्दलची सखोल चर्चा झालेली नसली तरी या 'प्लॅन बी'नुसार युएईने पाकिस्तानबरोबर संयुक्तरित्या चॅम्पियन्स चषक 2025 आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे.

बरेच बदल करावे लागतील

क्रिकेट पाकिस्तान डॉट कॉमला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी संघाला पाकिस्तानमध्ये पाठवलं नाही तर जो काही अतिरिक्त खर्च होईल तो आयसीसीला करावा लागणार आहे. तसेच या मालिकेचं नियोजन करताना बरेच बदल करावे लागतील, त्याची जबाबदारीही आयसीसीकडेच असेल. काही सामने युएईमध्ये खेळवले जाण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. मात्र यासाठी वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहण्याबरोबरच इतर सर्व गोष्टीही जुळून येणं फार महत्त्वाचं आहे.

आयसीसीची सकारात्मक भूमिका

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने सुरक्षेसंदर्भातील चिंतेबद्दल काळजी घेतली आहे. तरीही एखाद्या देशाने संघ पाठवला नाही तर त्याबद्दलची सर्व जबाबदारी आयसीसीने घ्यावी असं पीसीबीचं म्हणणं आहे. पाकिस्तानने तर सुरक्षेचा आढावा घेण्यासंदर्भातील प्रस्तावही मांडला आहे. आयसीसीनेही याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली असून 2025 मध्ये या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांच्या दृष्टीने सोयीचा निर्णय गेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे.

आशिया चषक स्पर्धाही अशीच आयोजित केली

बीसीसआयकडून चॅपियन्स ट्रॉफीचं आयोजन हायब्रीड पद्धतीने करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. आशिया चषक 2023 चे आयोजनही बीसीसीआयच्या भूमिकेमुळे पूर्णपणे पाकिस्तानमध्ये करण्याऐवजी पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये संयुक्तरित्या करण्यात आलेलं. मात्र श्रीलंकेतील अनेक सामने हे पावसामुळे रद्द झाले होते. त्यामुळेच बीसीसीआयच्या या निर्णयावरुन पीसीबीकडून वेगवेगळे दावेही करण्यात आले होते. अगदी भारताला युएईचा पर्याय सुचवल्याचंही पाकिस्तानने त्यावेळेस म्हटलं होतं.